प्रमुख रस्त्यांवर पुन्हा ‘पे अॅन्ड पार्क’
By admin | Published: April 16, 2015 12:54 AM2015-04-16T00:54:12+5:302015-04-16T00:54:12+5:30
शहरातील प्रमुख सात रस्त्यांवर पूर्वीप्रमाणे चारचाकी वाहनांसाठी पे अॅन्ड पार्क सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.
पुणे : शहरातील प्रमुख सात रस्त्यांवर पूर्वीप्रमाणे चारचाकी वाहनांसाठी पे अॅन्ड पार्क सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. वाहतूक विभागाने याकरिता हरकत नसल्याचा अभिप्राय दिल्याने पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, ठेकेदारांकडून ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त दराने पैसे वसूल केले जात असल्याच्या प्रकाराविरुद्ध मात्र काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
स्थायी समितीसमोर मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, बंडगार्डन रस्ता आणि ढोले पाटील रस्ता या चार रस्त्यांसह अन्य तीन रस्त्यांवर पे अॅन्ड पार्क योजना राबविण्यात येणार आहे. शहरात महापालिकेच्या पार्किंगमध्ये ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे वाहनचालकांकडून घेण्यात येत असल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी अनेक लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु यातील एकाही ठेकेदारावर अद्याप महापालिकेकडून अद्याप ठोस कारवाई करण्यात आली नाही.
पार्किंगचा ठेकेदारांशी केलेला एक वर्षाचा करार ३१ मार्च रोजी संपुष्टात आला. त्यानंतर पुन्हा नवीन करार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याच वेळी ठेकेदारांनी नियमांचे पालन करावे याबाबत काहीच उपाययोजना प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावात करण्यात आल्या नाहीत.
(प्रतिनिधी)
प्रशासनातर्फे प्रस्ताव
जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर ही योजना राबविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. १६ लाख २८ हजार रुपयांना या रस्त्यावर ‘पे अॅन्ड पार्क’ राबविण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. तसेच ढोले पाटील रस्ता आणि बंडगार्डन रस्त्यावर ही योजना राबविण्यासाठी ११ लाख २५ हजार रुपये देण्याची तयारी कंत्राटदाराने दर्शविली आहे.