देवेन शहा खूनप्रकरणी मुख्य सुत्रधाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 08:32 PM2018-06-19T20:32:13+5:302018-06-19T20:32:13+5:30
गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेचे पोलीस पंडितचा युध्दपातळीवर शोध घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
पुणे : बांधकाम व्यावसायिक देवेन शहा खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा हस्तक राजेश उर्फ पंडित के अग्रवाल याला शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली असून त्याला मंगळवारी (सायंकाळी) पुण्यात आणण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेचे पोलीस पंडितचा युध्दपातळीवर शोध घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
रविंद्र सदाशिव चोरगे (वय ४०, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) आणि राहुल चंद्रकांत शिवतारे (वय ४५, रा. वडगाव बुद्रुक) यांनी बिल्डर देवेन शहा यांचा १३ जानेवारी रोजी रात्री प्रभात रस्त्यावरील सायली अपार्टमेंटमध्ये गोळया झाडून खून केला होता.
डेक्कन पोलिसांनी रविंद्र चोरगेला जळगाव येथील केपी हॉटेलमधून अटक केली होती. त्यानंतर शिवतारे याला अटक करण्यात आली. शहा यांचा खून करून ते मध्यप्रदेशात आश्रयाला गेले होते. प्रकरणाचा तपास चालु असतानाच पोलिसांनी शहा खून प्रकरणातील आरोपी सुरेंद्र शामकर पाल (वय ३६, रा. ठाणे), सुनिल उर्फ सोनु मदनलाल राठोर (वय ३४, रा. राजेंद्रनगर, मुळ रा. मध्यप्रदेश), समीर रजनीकांत सदावर्ते (वय ४२, रा. शिवतीर्थनगर, कोथरूड) आणि नितीन दशरथ दांगट (वय ३६, रा. वारजे माळवाडी) यांना अटक केली.
शहा खून प्रकरणातील आरोपी सुनिल उर्फ मदनलाल राठोर याच्यावर २३ मार्च २०१८ रोजी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. बिल्डर शहा खून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून २७ मार्च २०१८ रोजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्क प्रदीप देशपांडे आणि पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त समीर शेख हे करत होते. गेल्या दोन महिन्यांपासून गुन्हे शाखेचे पोलिस पंडितच्या मागावर होते. अनेक वेळा पंडितची माहिती काढण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये गेले होते़.
पंडित हा दिल्ली येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक आयुक्त समीर शेख, सहाय्यक निरीक्षक सुनिल गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंडितला दिल्ली येथून ताब्यात घेतले. कुख्यात डॉन छोटा राजनचा हस्तक पंडित याच्याविरूध्द मुंबई आणि उज्जैन येथे फसवणुकीसह इतर गंभीर गुन्हयांची नोंद आहे. पंडित याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पंडितच्या अटकेमुळे बिल्डर देवेन शहा खून प्रकरणात अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे़. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक आयुक्त समीर शेख करत आहेत.