दाेन पेपरमध्ये १ दिवसाची सुटी कायम ठेवा; वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सलग परीक्षेमुळे विद्यार्थी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 01:52 PM2024-06-20T13:52:36+5:302024-06-20T13:53:41+5:30

विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. माधुरी कानिटकर यांना याबाबत पालकांकडून पत्र देण्यात आले. त्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना एक दिवस सुटी मिळाल्याने पुढील विषयाच्या पेपरची तयारी व अभ्यास करायला काही कालावधी मिळतो...

Maintain 1 day leave in both papers; Students are worried due to consecutive examinations of medical courses | दाेन पेपरमध्ये १ दिवसाची सुटी कायम ठेवा; वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सलग परीक्षेमुळे विद्यार्थी चिंतेत

दाेन पेपरमध्ये १ दिवसाची सुटी कायम ठेवा; वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सलग परीक्षेमुळे विद्यार्थी चिंतेत

पुणे : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर पदवी, तसेच पदविका परीक्षेदरम्यान दोन पेपर्समध्ये एक दिवसाची सुटी दिली जाणार नाही आणि सलग परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सर्व पेपर्स सलग द्यावे लागणार आहेत, तसेच हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचा आणि तीव्र मानसिक त्रास देणारा असून, परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. माधुरी कानिटकर यांना याबाबत पालकांकडून पत्र देण्यात आले. त्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना एक दिवस सुटी मिळाल्याने पुढील विषयाच्या पेपरची तयारी व अभ्यास करायला काही कालावधी मिळतो. अभ्यासाची उजळणी करता येते, तसेच थोडा शारीरिक व मानसिक आरामही मिळतो. सुटी रद्द केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळणार नाही, तसेच विद्यार्थ्यांना प्रचंड व असह्य मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागेल याची गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक आहे. या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण होणे, मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

काय आहे शिक्षण मंडळाचा ठराव?

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयाेग, नवी दिल्ली यांच्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार वैद्यकीय पदवी एमबीबीएस आणि वैद्यकीय पदव्युत्तर पदवी / पदविका पीजी डिप्लाेमा, डीएम, एमसीएच आणि पदव्युत्तर पदवी एमडी, एमएस या अभ्यासक्रमाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा एक महिन्याच्या आत घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या हिवाळी २०२४ सत्रातील परीक्षा एक दिवसाची सुटी न देता सलग (सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून) घेण्यात यावी. जेणेकरून परीक्षा एक महिन्याच्या आत पूर्ण हाेतील, असा निर्णय परीक्षा मंडळाच्या दि. १२ फेब्रुवारी २०२४ राेजीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असे विद्यापीठाच्या दि. ४ जून राेजीच्या परिपत्रकात नमूद आहे.

विद्यापीठाने हा निर्णय घेताना विद्यार्थी, पालक संघटनांशी विचार विनिमय व चर्चा करणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक छळ करणारा हा निर्णय रद्द करावा व पूर्वीप्रमाणेच दोन पेपर्स दरम्यान सुटी देण्याचा निर्णय कायम ठेवावा, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

- डाॅ. संजय दाभाडे, पालक

 

Web Title: Maintain 1 day leave in both papers; Students are worried due to consecutive examinations of medical courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.