सराफ दुकान, पतसंस्थेसह बँकेत पोलीस व्हिजिट नोटबुक ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:45 PM2019-03-31T23:45:37+5:302019-03-31T23:45:54+5:30
बारामती तालुक्यात वाढत्या घरफोड्या : उपाययोजना राबविण्याची सूचना
बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्यांमुळे पोलिसांनी उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. २४ तास पोलीस व्हिजिट नोटबुक ठेवतील. पोलीस अधिकारी, कर्मचारी हे गस्तीसाठी आल्यास ते सदर नोटबुकमध्ये नोंद करतील, याबाबत पोलीस प्रशासनाने सराफ दुकान, पतसंस्था, बँकेत २४ तास पोलीस व्हिजिट नोटबुक ठेवणार आहेत. त्यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी हे गस्तीसाठी आल्यास ते सदर नोटबुकमध्ये नोंद करण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पत्र पाठवून संवाद साधला आहे. या पत्राद्वारेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पोलिसांनी संबंधितांना चोवीस तास सशस्त्र सुरक्षा कर्मचारी नेमावा, नागरिकांनी रात्री-अपरात्री सतर्क राहून बाहेर गावी जाताना घरात चोरी होणार नाही याची विशेष काळजी घ्या, असे बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आवाहन केले आहे. ग्रामीण भागासह एमआयडीसी परिसरात सातत्याने होत असलेल्या घरफोड्या वाढल्या आहेत. नुकतीच मल्हार बंगला, सायली हिल येथे साडेदहा लाख रुपयांची झालेली घरफोडी यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. वाढती घरफोडी चोरी या पार्श्वभूमीवर बारामती ग्रामीण पोलिसांनी धाडसाचे पाऊल उचलले आहे. घरफोड्या कमी होतील यासाठी गस्त घालून उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
सराफ दुकान, पतसंस्था, बँक यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित संस्थेत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे फोटोसहित माहिती ठेवावी, संस्था, सराफ दुकान व बँकेत येणाऱ्या जाणाºया व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत; तसेच कॅमेºयाचे डीव्हीआर मशीन सुरक्षित व गोपनीय ठिकाणी ठेवावेत. चांगल्या कंपनीचे अलार्म व्यवस्था बसवून घेऊन, फोटो इलेक्ट्रिक, इफेक्टवाला बग्युलरी दोन अलार्म ठेवावेत. अलार्म कोणाच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीने लावावा, पुरेसा प्रकाश पडेल अशी लाईटची व्यवस्था करावी.
२४ तास पोलीस व्हिजिट नोटबुक ठेवतील. पोलीस अधिकारी, कर्मचारी हे गस्तीसाठी आल्यास ते सदर नोटबुकमध्ये नोंद करतील, कोणी संशयीतरीत्या वावरताना आढळून आल्यास त्यांची माहिती तत्काळ जवळचे माळेगाव पोलीस दूरक्षेत्र व बारामती तालुका पोलीस स्टेशनचे फोन क्रमांक देऊन कळविणेबाबत सर्व संबंधितांना सूचना करण्यात आल्या आहेत, संस्थेत नेमण्यात येणाºया सुरक्षा कर्मचारी यांना सतत सतर्क राहून वारंवार गस्त घालण्या संबंधी सूचना देण्यात याव्यात, पोलीस स्टेशन, महसूल, अग्निशमक, मॅनेजर व इतर महत्त्वाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक पाटीसहित लावण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या असून, या संदर्भात विशेष काळजी घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोडसे यांनी दिली आहे.
सध्या शेतातील सुगीचे दिवस संपून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या परीक्षेचा काळ संपून सुट्या लागल्याने अनेक स्थानिक रहिवासी सुटीनिमित्त, देवदर्शन व फिरण्यासाठी घरास कुलूप लावून सर्व कुटुंब जात असते; तसेच सुटीचा हंगाम चालू असल्याने नोकरदार वर्ग राहत्या घरास टाळे लावून मूळ गावी जात असतात. सध्याचा चालू असलेला हंगामदेखील अंतिम टप्प्यात असल्याने हंगामाकरिता बाहेर गावावरून आलेले ऊसतोड मजूर गावाकडे काम संपवून निघून जाण्यास सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने चोरट्यांनी या संधीचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले नुकसान न होऊन देण्यासाठी घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित बँक लॉकर अथवा आपल्या सोईनुसार सुरक्षित ठेवाव्या.