पुण्याचे पाणी कायम ठेवू; मुख्यमंत्र्यांची महापौरांना माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 03:10 AM2018-11-02T03:10:47+5:302018-11-02T03:11:06+5:30
पाणीप्रश्नावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर विमानतळावर भेट देऊन पुण्याला पाणी वाढवून देणार नाही; परंतु आता आहे तेवढेच म्हणजे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
पुणे : पुण्यातील पाणीप्रश्नावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर विमानतळावर भेट देऊन पुण्याला पाणी वाढवून देणार नाही; परंतु आता आहे तेवढेच म्हणजे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
पुण्याच्या पाण्यात जलसंपदा विभागाने कपात केली असल्याने पाणीप्रश्न तीव्र बनला आहे. जलसंपदा विभाग ११५० एमएलडीच पाणी देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. कालवा समितीच्या बैठकीतच हा निर्णय झाला असल्याने महापालिकाही हतबल झाली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना टिळक म्हणाल्या, सध्या महापालिका १३५० एमएलडी पाणीच वापरते आहे. त्यामुळे वेळापत्रक करून कसेबसे पाणी भागत आहे. पण तरीही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर जलसंपदा विभागाकडून ११५० एमएलडीच पाणी मिळू लागल्यावर पुण्याचा पाणीप्रश्न भीषण होईल. यावर मुख्यमंत्र्यांनी पुण्याला १३५० एमएलडी पाणी दिले जाईल, असे सांगितले. याबाबत आपण जलसंपदा सचिवांशी बोलून आदेश काढण्यास सांगू, असे आश्वासन दिले.
जाहीर कार्यक्रमात पाणीप्रश्नावर मौन
महापालिका आणि जलसंपदाच्या युद्धात नागरिक भरडले जात असल्याने पुण्यातील भाजपाचे पदाधिकारी त्यांच्याकडे तक्रार करतील. मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात पाणीप्रश्नावर बोलतील.
गरज भासल्यास बैठक घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली
जात होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही कार्यक्रमांत कोणत्याही भाजपाच्या वक्त्याने पाणीप्रश्न मांडला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीही काही बोलले नाहीत.