रमजानचे पावित्र्य राखले; मशीद येताच स्पीकर बंद, मुस्लिम युवकांचाही ‘जय भीम’चा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:14 AM2023-04-19T10:14:19+5:302023-04-19T10:14:28+5:30
पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत दिसून आले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
लष्कर : यंदाच्या आंबेडकर जयंतीमध्ये मुस्लिम आणि आंबेडकरी समाजाकडून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन अख्ख्या पुण्याने पाहिले. मिरवणूक मंडळांनी मशिदीजवळ येताच स्पीकर बंद केला तर मुस्लिम युवकांनी प्रत्येक मिरवणुकीत जात प्रत्येक मंडळाचा सन्मान करत अरोरा टॉवर येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यंदाची डॉ आंबेडकर यांची १३२ वी जयंती लष्कर भागात मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाली. याचदरम्यान मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिनाही सुरू आहे. जयंतीनिमित्त लष्कर भागात मिरवणुका मोठ्या उत्साहात होता असतात. मिरवणूक मार्गावरच कॅम्पमध्ये कुरेशी मशीद आणि रावसाहेब केदारी रस्त्यावर कोहिनूर हॉटेल शेजारीच एक मशीद आहे. यावर्षी रमजान महिन्याचे पावित्र्य राखत सबंध आंबेडकरी समाजाने मिरवणूक मार्गावरील मशिदीजवळ येताच लाउड स्पीकर्स बंद ठेवून माईकवर मुस्लिम समाजाला रमजानच्या शुभेछा देत धर्माचा मान ठेवला तर आंबेडकरी समाजाच्या या कृतीला प्रतिसाद देत अल कुरेशी युवा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मिरवणुकीत स्वतः जात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मंडळांच्या अध्यक्षांचा शाल व पुष्प देऊन सन्मान केला. शेवटी अरोरा टॉवर येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुस्लिम युवकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत अर्धा तास पुतळा परिसरात जय भीमच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.