आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई; गोध्रा हत्याकांडाचा फरार मुख्य आरोपी अखेर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 17:54 IST2025-02-02T17:48:31+5:302025-02-02T17:54:05+5:30

आरोपींवर महाराष्ट्रात 3 तर गुजरातमध्ये १३ असे ऐकून १६ गुन्हे दाखल

Major action by Alephata police The absconding main accused of Godhra massacre finally arrested | आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई; गोध्रा हत्याकांडाचा फरार मुख्य आरोपी अखेर गजाआड

आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई; गोध्रा हत्याकांडाचा फरार मुख्य आरोपी अखेर गजाआड

आळेफाटा :गुजरातमध्ये घडलेलं बहुचर्चित गोध्रा हत्याकांडात जन्मपेठ झालेला आरोपी पॅरोल रजेवर फरार होवून चक्क महाराष्ट्रात दरोडा टाकला. नगर-कल्याण महामार्गावर पेट्रोल पंपावर रात्रीच्यावेळी उभ्या असलेल्या आयशर टेम्पोमधून टायर चोरीसाठी इतर चार आरोपींची मदत घेत दरोडा टाकल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा (वय ५५) रा. गोध्रापंचमहाल ता. गोध्रा जि. पंचमहाल राज्य गुजरात असे सदर गुन्हयातील मुख्य आरोपीचे नाव आहे. आळेफाटा पोलिसांनी गुन्हाच सखोल तपास करत मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस स्टेशन व नाशिक जिल्यातील सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्यावर महारष्ट्र आणि गुजरात राज्यात १६ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.

आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले कि, ७ जानेवारी २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत मौजे आणे गावचे हद्दीत इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाचे आतील मोकळे जागेत फिर्यादी वाहन चालक सोमनाथ नारायण गायकवाड वय ३० वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. करकंब ता. पंढरपुर जि.सोलापुर हा त्याच्या ताब्यातील आयशर कंपनीचा टेम्पो कमांक एमएच ०५ डीके ७६३३ यामध्ये भिवंडी येथील जेके टायर्स अॅन्ड इंडस्टील लि. शक्ती लॉजीस्टीक पार्क भिवंडी महाराष्ट्र कंपनीचे गोडावून मधून १६५ टायर घेवून सोलापुर येथे जात असताना आणे परिसरात झोपला होता. कोणीतरी अज्ञात चोरटयांनी टेम्पोच्या पाठीमागील ताडपत्री व रस्सी तोडून गाडीच्या आतील टीएल मॉडेलचे प्लॅक्स लहान टायर १८ व टी एल मॉडेलचे मोठे टायर लंगोट व ट्युब असे २२ नग एकुण २ लाख ४९ हजार ६२२ किंमतीचा मुद्देमाल चोरून नेलेबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं ०६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान गुन्हयाचा तपास करीत असताना मंचर पोलीस स्टेशन व सिन्नर पोलीस स्टेशन, नाशिक येथे ढाबे व पेट्रोलपंप भागात थांबणाऱ्या गाड्यांची पाठीमागील बाजुने ताडपत्री फाडून गाडीतील मुद्देमाल चोरून नेलेबाबत अशाच प्रकारचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे नमुद गुन्हयांची गुन्हा करण्याची पध्दत ही एकाच प्रकारची असल्याने सदर गुन्हयांचा अभ्यास करून अशाप्रकारचे गुन्हे करणारी टोळी ही गुजरात राज्यातील गोवा या ठिकाणची असल्याची गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

सदर संशयीतांचे मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आयशर टेम्पो कमांक जीजे १४ एक्स ८८५३ याच्या सहाय्याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे सदर आयशर टेम्पोचा शोध घेवून सदरचा आयशर टेम्पो चांदवड जि.नाशिक येथून आरोपी नामे सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा वय ५५ वर्षे, साहील हनीफ पठाण वय २१ वर्षे, सुफीयान सिकंदर चंदकी वय २३ वर्षे, आयुब इसाग सुनठीया वय २९ वर्षे, इरफान अब्दुलहामीद दुरवेश वय ४१ वर्षे रा. गोध्रापंचमहाल ता. गोध्रा जि. पंचमहाल राज्य गुजरात यांच्यासह ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंषाने सखोल चौकशी केली असता नमुद आरोपींनी आळेफाटा, मंचर तसेच सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. 

सदर आरोपींकडुन त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेला आयशर टेम्पो गुन्हयातील चोरीस गेला मुद्देमाल असा एकुण १४ लाख ४० हजार ८७८ रूपये किंमतीचा मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे. तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून सदर कालावधीमध्ये तो शिक्षा भोगत असताना ०८ वेळेस पॅरोल रजेवर असताना तो परत कारागृहात हजर न होता टोळी बनवून चोरीचे गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याच्या विरोधात महाराष्ट्रातील आळेफाटा पोलीस ठाण्यात १, मंचर १, सिन्नर जिल्हा नाशिक १ असे तीन गुन्हे तर गुजरात राज्यात १३ असे ऐकून १६ गुन्हे दाखल आहे. 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पो.हवा विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, आमित पोळ, पो. कॉ. अमित माळुंजे, नविन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.

Web Title: Major action by Alephata police The absconding main accused of Godhra massacre finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.