शरद मोहोळ हत्याप्रकरणात मोठी कारवाई; ८ जण पुणे पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:42 PM2024-01-05T22:42:10+5:302024-01-05T22:56:25+5:30
शुक्रवारी आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. शरद मोहोळच्या लग्नाचा आज वाढदिवस होता
पुणे - कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला होता. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. त्यामध्ये शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला होता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली असून ८ जणांना ताब्यात घेतलं आहे.
शुक्रवारी आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. शरद मोहोळच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. तो मंदिरात चालला होता. त्यावेळी अज्ञातानी मोहोळवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे ८ जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून तीन पिस्टल हस्तगत केले आहेत. ज्या पिस्टलमधून शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला होता, ती पिस्टल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या आरोपींकडून हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या २ दुचाकी सुद्धा ताब्यात घेतल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनी ही कारवाई केली असून आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. नेमकी ही हत्या कशामुळे करण्यात आली, याचा तपास होत आहे.
दरम्यान, खेड शिवापूर जवळील भागात हे सर्वजण लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे
शरद मोहोळ कोण?
शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली. येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते.