इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई; नाकाबंदीत ३२ लाखांचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:32 PM2021-12-23T17:32:18+5:302021-12-23T17:32:30+5:30
सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने येणारे वाहन तपासणी सुरु असताना न थांबता निघून गेल्याने वाहनाचा पाठलाग करून अवैध गुटखा जप्त केल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली
बाभुळगाव : पुणे - सोलापूर हायवेवरील सरडेवाडी टोलनाक्याजवळ इंदापूर पोलीस पथकाच्या नाकाबंदीत तब्बल ३२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने येणारे वाहन तपासणी सुरु असताना न थांबता निघून गेल्याने वाहनाचा पाठलाग करून अवैध गुटखा जप्त केल्याची माहिती इंदापूरपोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्ह दाखल कारण्यात आला आहे.
गणेश आबासो चव्हाण (वय२५, रा.शेटफळ,ता.मोहोळ,जि.सोलापूर) व गाडी मालक चंद्रकांत क्षिरसागर (रा.बारामती,जि.पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाई ही २३ डिसेंबरला रात्री एकच्या सुमारास इंदापूर बाह्यवळण महामार्ग महात्मा फुले चौक येथे इंदापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर, सहाय्यक पोलीस निरिक्षक दाजी देठे, पो.ना.मनोज गायकवाड व पो.काँ.फडणीस यांचे पथकाने केली आहे.
सदर गुटखा हा मानवी जिवितास अपायकारक व प्रतिबंधित पदार्थ आहे. सदरचा माल आरोपींनी स्वत:चे फायद्याकरीता विक्री व वाहतुक करीत असताना वाहनासह मिळून आले आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र अन्न सुरक्षा आयुक्त प्रतिबंधित कायदा व भारतीय दंड संहिता कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.