पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरणातील १६ अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 02:57 PM2021-12-20T14:57:46+5:302021-12-20T14:58:02+5:30
२० ग्रामपंचायतीमधील २१२ माजी पंचायतराज सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच 16 अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे
पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी २० ग्रामपंचायतींमध्ये चुकीच्या पद्धतीने कर्मचारी नियुक्त केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती नेमण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषदेने या चौकशीचा अहवाल सादर केला असून २२ अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे. आणि २० ग्रामपंचायतीमधील २१२ माजी पंचायतराज सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच 16 अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
या २० ग्रामपंचायतीतील ६९ कर्मचारी त्यांच्या मंजूर आकृतीबंधावर होते. यापूर्वी २४७ जणांची भरती करण्यात आली होती. आणि ते बऱ्याच दिवसांपासून कार्यरत होते. परंतु, या २० ग्रामपंचायतींमध्ये त्या पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी ६५८ जणांची भरती करण्यात आली. हवेलीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या चौकशीत मांजरी ग्रामपंचायतींमध्ये ४४ जणांची भरती झाल्याचे निष्पन्न झाले होते.
कायद्यानुसार विभागीय चौकशीची सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयात होणार
कर्मचार्यांच्या यादीसह अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पुणे महानगरपालिकेकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाची प्रत महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागालाही सादर करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून कायद्यानुसार विभागीय चौकशीची सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.