लष्कर पेपरफुटी प्रकरणी मेजरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:07+5:302021-03-08T04:13:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे आर्मी रिलेशन लेखी परीक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तमिळनाडूतून आज एका मेजर दर्जाच्या अधिका-याला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे आर्मी रिलेशन लेखी परीक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तमिळनाडूतून आज एका मेजर दर्जाच्या अधिका-याला अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक केली आहे.
तमिळनाडू येथून या लष्करी अधिका-याला पोलिसांनी ताब्यात घेऊन रविवारी सकाळी पुण्यात आणले. त्यानंतर त्याला औपचारीकरीत्या अटक करण्यात आली. पेपर लीक करण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याचा संशय आहे. या प्रकरणात आमची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता अधिक माहिती देणे उचित नसल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
आर्मी शिपाई भरतीची लेखी परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी पुण्यासह देशातील ४० सेंटरवर होणार होती. लष्कराचा गुप्तचर विभाग आणि पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत या परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देशभरातील परीक्षा रद्द करण्यात आली होती. याप्रकरणी परीक्षेसाठी क्लास घेणारे, निवृत्त लष्करी कर्मचारी तसेच सध्या कार्यरत लष्करातील कर्मचारी अशा ७ जणांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याच्या तपासासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.