पुणे शहरात मेट्रो कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

By अजित घस्ते | Published: May 30, 2024 06:53 PM2024-05-30T18:53:37+5:302024-05-30T18:55:25+5:30

या बदलानुसार विद्यापीठ रस्त्याने शिवाजीनगरकडे येणाऱ्या वाहनांना एबिल हाऊस ते सिमला ऑफिस चौक हा टप्पा पूर्णपणे बंद असेल...

Major change in traffic on Ganeshkhind road for metro work in Pune city; Learn about alternative ways | पुणे शहरात मेट्रो कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे शहरात मेट्रो कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील पाच मेट्रो स्थानकांच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व प्रकारची मालवाहतूक, खासगी प्रवासी बसेस, पीएमपीएल बसेसना ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून डॉ. आंबेडकर चौकातून जावे लागेल. तर, दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना एबिल हाऊस येथून डावीकडे वळून रेंजहिल्स मार्गे जावे लागेल.

या बदलानुसार विद्यापीठ रस्त्याने शिवाजीनगरकडे येणाऱ्या वाहनांना एबिल हाऊस ते सिमला ऑफिस चौक हा टप्पा पूर्णपणे बंद असेल. तसेच पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो उभारण्याचे काम सुरू आहे. टाटा कंपनीकडून हे काम केले जात आहे. काम वेगाने पूर्ण करण्यासाठी आचार्य आनंद ऋषींजी चौक (विद्यापीठ चौक), आरबीआय, कृषी महाविद्यालय, सिमला ऑफिस आणि शिवाजीनगर कोर्ट या पाच मेट्रो स्थांनकांचे काम  एकाचवेळी हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी ब्रेमेन चौक ते सिमला ऑफिस चौक या मार्गावर ठिकठिकाणी वाहतूकीत मोठा  बदल प्रस्तावित केला आहे. येत्या एक जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. यावेळी वाहतूक उपयुक्त रोहिदास पवार उपस्थित होते. 

विद्यापीठ चौक वाहतुकीत मोठा बदल तर पीएमपीएलला मोठा वळसा :

औंध रोडवरील ब्रेमेन चौकामधुन पुणे विद्यापीठ चौकामध्ये येणा-या फक्त दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश असेल. विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून ही वाहने विद्यापीठाच्या आतील रस्त्याने व्हॅमनीकॉमचे मुख्य प्रवेशद्वारातुन गणेशखिंड रोडवर येतील. तर, पीएमपी बसेससह अन्य सर्व जड वाहनांना ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून (औंध रस्ता) जयकर पथावरुन आंबेडकर चौक - साई चौक - सिंफनी चौक (रेंजहिल) येथून कृषी महाविद्यालयाकडील रस्त्याने न.ता.वाडीकडे जातील. तर, पुणे स्टेशन, नगररोड कडे जाणा-या वाहनांनी ब्रेमेन चौक येथून डॉ. आंबेडकर चौक - बोपोडी चौकमार्गे मुंबई पुणे रस्त्यावर जावे. हिंजवडी - सांगवी परिसरामधुन येऊन सेनापती बापट रोडवर जाणा-या पीएमपीएल बसेस ऋषी मल्होत्रा चौकामधून उजवीकडे वळण घेवुन परिहार चौकातून डावीकडे वळण घेवुन बाणेर रोडवरुन विद्यापीठ चौक मार्गे धावतील.

मेट्रो स्टेशन आर. बी. आय. स्थानक येथील गर्डर लॉचिंग करणेसाठी  विद्यापीठ चौकामधुन रेंजहिल्स चौकापासुन पुढे शिवाजीनगरकडे येण्यासाठी गणेशखिंड रोडवरुन सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. या मार्गावरील वाहनधारकांसाठी रेंज हिल्स कॉर्नर येथून जावे लागेल. तर, सिमला ऑफिस चौकामधुन सीओईपी हॉस्टेलच्या बाजुने स.गो. बर्वे चौकाकडे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी संचेती हॉस्पीटल समोरुन उजवीकडे वळण घेवुन स.गो. बर्वे चौक येथे जावे.  संचेती हॉस्पिटल समोरील अंडरपास दररोज रात्री १० ते सकाळी ७  पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. 

पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स रस्ता बंद 

पुणे मुंबई महामार्गावरील पोल्ट्री फार्म चौकामधुन रेल्वे अंडरपासमार्गे रेंजहिल्सकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. विद्यापीठ, औंध, बाणेरकडून येणारी वाहने रेंजहिल्स मार्गे पोल्ट्री फार्म चौकातून पुढे मार्गस्थ होतील. 

Web Title: Major change in traffic on Ganeshkhind road for metro work in Pune city; Learn about alternative ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.