सेवानिवृत्त मेजर जनरल सुधीर जठार यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 09:26 AM2023-10-24T09:26:01+5:302023-10-24T09:28:36+5:30
ते ऑइल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) या पदावर पोहोचले होते.
श्रीकिशन काळे
पुणे : मेजर जनरल सुधीर श्रीराम जठार (निवृत्त) यांचे ९१ व्या वर्षी सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी व इतर नातेवाईक असा परिवार आहे. पुण्याच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांची लष्करात एक मोठी कारकीर्द होती आणि त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रात, त्यांची ऑइल इंडिया लि.चे निवासी मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर ते ऑइल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) या पदावर पोहोचले होते.
जठार यांनी सरकारमध्ये इतर प्रतिष्ठित पदे भूषवली आणि विविध सरकारी संस्थांकडून त्यांना तेल क्षेत्रातील कौशल्यासाठी बोलावण्यात आले होते. सैन्यात काम केल्यानंतर त्यांनी आपले जीवन निःस्वार्थपणे समाजसेवेसाठी समर्पित केले होते. त्यांनी पुण्यात नागरीक चेतना मंच ही संघटना सुरू केली होती. पुण्यातील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. त्यात सक्रिय सहभाग घेतला. शहर विकासासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. वेताळ टेकडी येथून पुढे महापालिका पौड बालभारती रस्ता करणार होती. त्याच्या समितीवर तज्ज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. हा रस्ता केल्याने टेकडीचे नुकसान होईल आणि सेनापती बापट रोडवरील कोंडी काही सुटणार नाही, असा सल्ला त्यांनी दिलेला होता.