भुशी डॅम परिसरात मोठी घटना; बाजूला असलेल्या धबधब्यातून ५ पर्यटक मुले धरणात वाहून गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 04:44 PM2024-06-30T16:44:03+5:302024-06-30T16:44:21+5:30
जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे चार ते पाच पर्यटक पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले
लोणावळा : भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून 4 ते 5 पर्यटक मुले धरणात वाहून गेले असल्याची भीती वर्तवली जात आहे. या पर्यटकांचा शोध शिवदुर्ग रेसक्यू पथकाच्या मदतीने सुरु आहे. आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
लोणावळा परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून वाहणाऱ्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत होते. दरम्यान सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे चार ते पाच पर्यटक पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले आहेत. ही माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मुले वानवडी येथील सय्यदनगर भागातील आहेत.