लष्कर, रेल्वे भरतीचा मोठा गैरव्यवहार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:49+5:302021-06-03T04:09:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लष्करातील पेपरफुटी प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर, आता लष्कराच्या मदतीने गुन्हे शाखेने लष्कर आणि रेल्वेतील ...

Major malpractices of army and railway recruitment exposed | लष्कर, रेल्वे भरतीचा मोठा गैरव्यवहार उघडकीस

लष्कर, रेल्वे भरतीचा मोठा गैरव्यवहार उघडकीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लष्करातील पेपरफुटी प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर, आता लष्कराच्या मदतीने गुन्हे शाखेने लष्कर आणि रेल्वेतील बोगस भरतीचा मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला.

भारत कृष्णा काटे (वय ४१, रा. मु़ पो़ राजुरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) राजेंद्र दिनकर संकपाक (रा. सातारा), दयानंद जाधव आणि बी. के. सिंग (रा. लखनौ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी सलमान गौरुउद्दीन शेख (वय २१, रा. मु़ पो़ करडखेल, लव्हारा, ता. उदगीर, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर गुन्ह्याचा कट रचून बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे उपयोगात आणणे तसेच ‘आयटी अ‍ॅक्ट’च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतातील विविध ठिकाणी हा प्रकार ऑगस्ट २०२० मध्ये घडला आहे.

आरोपींनी आपापसांत संगनमत करून सलमान, शिवाजी जाधव आणि नवनाथ जाधव यांना लष्करामध्ये भरतीसाठी ६ लाखांची मागणी केली. तसेच, फिर्यादीचा भाऊ सोहेल शेख याला रेल्वेमध्ये तिकीट चेकर म्हणून भरती करण्यासाठी ७ लाखांची मागणी केली. त्यांची खरोखरच भरती केली जात असल्याचे भासविण्यासाठी त्यांना वेळोवेळी दिल्ली, झांशी, रांची, लखनौ, जबलपूर येथे बोलावून घेतले. तसेच पुण्यातील घोरपडी येथील लष्कराच्या कार्यालयासमोरही आरोपींनी त्यांची भेट घेतली. त्यांनी ‘हेडक्वार्टरल आर्मी‘ या नावाने बनावट वेबसाईट तयार करून त्याद्वारे चौघांकडून १३ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांना बनावट नियुक्तिपत्रे देण्यात आली.

याचा सुगावा लष्कराच्या इंटेलिजन्सला लागला होता. त्यानुसार पुणे पोलिसांनी लष्कराच्या मदतीने सोलापूर येथून दोघांना मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. लष्कर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष (झीरो टॉलरन्स) असावी, यासाठी लष्कराचा कटाक्ष आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यांमध्ये लष्कराकडून पोलिसांना माहितीची देवाणघेवाणासह तपासात संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे सदर्न कमांडच्या वतीने सांगण्यात आले.

............

व्याप्ती मोठी असण्याची शक्यता

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लष्कर भरतीतील पेपरफुटीप्रकरणात लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करून मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. त्यासाठी लष्कराच्या मदतीने देशातील विविध भागांतून लष्करी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. आता या लष्कर व रेल्वे भरती प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.

Web Title: Major malpractices of army and railway recruitment exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.