विधानसभेचे बहुसंख्य इच्छुक गणपती बाप्पांच्या चरणी लीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 12:31 PM2019-09-03T12:31:39+5:302019-09-03T12:32:54+5:30

सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. तसे वारंवार सांगितलेही जात आहे.

majority aspirant of the Assembly dedicate in bappa's festival | विधानसभेचे बहुसंख्य इच्छुक गणपती बाप्पांच्या चरणी लीन

विधानसभेचे बहुसंख्य इच्छुक गणपती बाप्पांच्या चरणी लीन

Next
ठळक मुद्देदहिहंडीही गाजवली : आचारसंहितेआधीच्या उत्सवांचा फायदा

पुणे : विधानसभेचे बहुसंख्य इच्छुक गणरायाच्या चरणी लीन झाले आहेत. त्याआधी दहिहंडीचा उत्सवही बहुतेकांनी गाजवला. निवडणूक आचारसंहितेआधी आलेल्या उत्सवांचा फायदा घेत मतदारांसमोर चर्चेत राहण्याची संधी इच्छुकांकडून साधली जात आहे.त्यात आजीमाजी नगरसेवकांबरोबच मंडळाच्या माध्यमातून बरीच वर्षे परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्यांचाही समावेश आहे.
सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. तसे वारंवार सांगितलेही जात आहे. एकदा आचारसंहिता जारी झाली की इच्छुकांच्या मिरवण्यावर बंधने येणार आहेत. त्यामुळे त्याआधी येणाऱ्या सगळ्या सण व उत्सवांमध्ये मिरवण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांकडून केला जात आहे. नेते तयार करणारा उत्सव म्हणून गणेशोत्सव प्रसिद्ध आहेच. त्यामुळे बहुसंख्य इच्छुक कोणत्या ना कोणत्या तरी मंडळाबरोबर संबधित आहेतच. मंडळ नसले तर मग पुण्यनगरीत आलेल्या गणेश भक्तांचे स्वागत असे लिहिलेले मोठमोठे फ्लेक्स आपल्या कार्यक्षेत्रात लावून मतदारांसमोर सतत राहण्याचा प्रयत्न केला जात आहे.  
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ कोथरूड मधून विधानसभेसाठी इच्छुक आहे. या भागातील साई मित्र मंडळाचे ते संस्थापक आहेत. मंडळाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरेची रेलचेलच उडवून दिली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा देखावा त्यांनी साकारला असून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्याचे अनावरणही केले. भाजपाच्या अन्य काही नगरसेवकही आपापल्या मंडळाच्या माध्यमातून प्रसिद्धीची हौस भागवून घेत आहेत. 
धीरज घाटे हेही भाजपाचे नगरसेवक आहेत. त्यांनाही कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. अयोध्येतील नियोजित राम मंदिराचा भला मोठा देखावा त्यांनी साने गुरूजी मित्र मंडळात सादर केला आहे. त्यांनीही फ्लेक्स लावून मतदारांसमोर आपला चेहरा कायम राहील याची काळजी घेतली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्र व राज्यातील मंत्र्यांच्या छायाचित्रांची एक मोठी पट्टी व त्याखाली इच्छुकाचे भले मोठे छायाचित्र असे फ्लेक्स भाजपाच्या बहुसंख्य इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघातील मोक्याच्या ठिकाणी लावले आहेत.
विशाल धनवडे हे शिवसेनेचे नगरसेवक कसबा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनी दहिंहडीनिमित्त या मतदारसंघातील शिवसेनेच्या अनेक सार्वजनिक मंडळांना मदत करून सगळीकडे आपले फ्लेक्स झळकवले. आता गणेशोत्सवातही त्यांनी कसबा मतदारसंघात अनेक ठिकाणी भाविकांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. शिवसेनेच्या अन्य काही नगरसेवकांनीही गणेशोत्सवाचे निमित्त साधत आपालल्या मतदारसंघात फ्लेक्सचा पूर आणला आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आदित्य ठाकरेपर्यंत सर्वांची छायाचित्र व मध्यभागी स्वत:चे एक मोठे चित्र अशी या फलकांची रचना आहे.
सुनिल टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांना वडगाव शेरी मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. त्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहनाचा सोशल मिडियावरून धडाका लावला आहे. हौदात विसर्जन करणे कसे योग्य, पर्यावरणाचे रक्षण किती गरजेचे आहे असा संदेश देणारे व्हाटस अप फलक ते परिचितांमधील सर्वांना पाठवत आहेत. 

Web Title: majority aspirant of the Assembly dedicate in bappa's festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.