बहुमत आमचेच! दोन्ही पक्षांचा दावा, इंदापूर तालुका : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:08 AM2017-10-18T02:08:38+5:302017-10-18T02:08:42+5:30
इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी १७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे. हे हेवेदावे वगळता या दोन्ही पक्षांची प्रत्येकी आठ ग्रामपंचायतींवर निर्विवाद सत्ता आल्याचे दिसून येत आहे.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी १७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे. हे हेवेदावे वगळता या दोन्ही पक्षांची प्रत्येकी आठ ग्रामपंचायतींवर निर्विवाद सत्ता आल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असणाºया बिजवडी ग्रामपंचायतीच्या दहा जागा काँग्रेसने जिंकून देखील सरपंचपदाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्याने काँग्रेसची ग्रामपंचायतीवरील सत्ता गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे
जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांचे गाव असणाºया हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ५ जागा जिंकून काँग्रेसचे शरद
देवकर यांच्या अधिपत्याखालील पॅनलने ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली.
रेडणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भीमराव काळे अपक्ष म्हणून विजयी झाले. ते मूळचे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते. पण स्थानिक कारणावरून त्यांचे व हर्षवर्धन पाटील यांचे संबंध ताणले गेले. लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे श्रीमंत ढोले यांनी आपली सत्ता कायम ठंवली. ठेवताना त्याचे जुने सहकारी भाजपवासी प्रभाकर खाडे व नेहेमीचे प्रतिस्पर्धी तानाजी नाईक यांच्या पॅनलला नेस्तनाबूत केले. या ग्रामपंचायतीवर ढोले यांचीच सत्ता होती. मागील काळात त्यांचे सहकारी प्रभाकर खाडे भाजपामध्ये गेले. मात्र मजबूत संख्याबळ असल्याने ढोले यांची सत्ता तरली.
डाळज नं.१, कुरवली, पिंपरी शिरसोडी ग्रुप ग्रामपंचायत, रेडणी, थोरातवाडी, हिंगणगाव व बिनविरोध झालेल्या पडस्थळ, झगडेवाडी,गंगावळण या नऊ ग्रामपंचायतींवर दोन्ही पक्षांनी आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे.
या खेरीज बेलवाडी, बिजवडी, बोरी, डाळज नं. ३, जांब, मदनवाडी, न्हावी, म्हसोबाची वाडी, सराटी या ९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर अजोती सुगाव ग्रुप ग्रामपंचायत, डिकसळ, कळाशी, लाखेवाडी, माळवाडी, मानकरवाडी, रणमोडवाडी या ग्रामपंचायतींवर आपली सत्ता आल्याचे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.