संक्रातीची आवड ठरतीये जीवघेणी; नायलॉन मांजामुळे कापला गेला तरुणाचा गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 15:39 IST2023-01-04T15:38:12+5:302023-01-04T15:39:15+5:30
पतंग उडविताना नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यावर न उडविता मोकळ्या मैदानात उडवावे

संक्रातीची आवड ठरतीये जीवघेणी; नायलॉन मांजामुळे कापला गेला तरुणाचा गळा
सहकारनगर : गाडीवर जात असताना रस्त्याच्या मध्येच असलेल्या पतंगाचा मांजा आडवा आल्याने एकाचा गळा कापला गेला. तो मांजा हाताने काढताना त्यांच्या बोटेही मांजामुळे कापली गेली. ही घटना सहकारनगर परिसरात घडली. कृष्णा जाधव (रा. भवानी पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
नव्या वर्षाचे स्वागत केल्यानंतर वेध लागते ते संक्रातीचे आणि संक्रातीमध्ये मुलांचा आवडीचा विषय म्हणजे पतंग उडविणे. मात्र, या पतंगाच्या मांज्यामुळे दरवर्षी अनेकांचा शिरच्छेद होण्याची वेळ येते. अनेकांचा या मांजामुळे जीव गमावला गेला आहे. त्यामुळे चायनीज मांजावर बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय देशी मांजा करतानाही त्याला काच लावण्यात येते, त्यामुळे त्यापासूनसुद्धा मोठा धोका उद्भवत आहे. त्यामुळे पतंग उडविताना नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यावर न उडविता मोकळ्या मैदानात उडवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.