राज्यातील डान्सबार बंद करा, अन्यथा आंदोलन करणार, सुरेख पुणेकरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:04 IST2025-03-22T10:59:30+5:302025-03-22T11:04:59+5:30
रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक कलावंतांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे

राज्यातील डान्सबार बंद करा, अन्यथा आंदोलन करणार, सुरेख पुणेकरांचा इशारा
पुणे : राज्यातील सांस्कृतिककला केंद्रांमध्ये पारंपरिक संगीत आणि वाद्यांच्या जागी डीजेचा सर्रास वापर केला जात असल्याने हजारो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर कारवाई करावी, अशी मागणी सांस्कृतिक कला केंद्राचे अध्यक्ष धोंडिराम जवळे आणि ज्येष्ठ लावणी नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुणेकर म्हणाल्या, लावणी ही महाराष्ट्राची पारंपरिक कला असून, तिचे जतन होणे आवश्यक आहे. डीजेमुळे पारंपरिक संगीत आणि वाद्ये दुर्लक्षित होत आहेत. परिणामी कलावंत बेरोजगार होत आहेत. रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक कलावंतांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. यापूर्वीही प्रशासनाकडे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदने दिली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. डान्सबार बंद करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुरेखा पुणेकर यांनी दिला.
जवळे म्हणाले, महाराष्ट्राची कला आणि संस्कृती टिकली पाहिजे या उद्देशाने हे सांस्कृतिक कला केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. राज्यामध्ये ८२ सांस्कृतिक कला केंद्रे आहेत. यामध्ये नृत्यांगणांसह गायक, तबला, ढोलकी, पेटी यांचे वादन करणाऱ्या कलावंतांचा समावेश असावा असा नियम आहे. मात्र नियम धाब्यावर बसवून साधारण ४८ केंद्रांमध्ये डीजेचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे तबला, ढोलकी, पेटी वादकांसह गायक या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंपरागत वाद्य कलाकारांना काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हे कलाकार आर्थिक संकटात सापडले आहेत आणि काहींना तर पोट भरणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या कला केंद्रावर लवकरात लवकर कारवाई करावी.