सौरपंपातून करा शेती पाणीदार, सुमारे २५ हजार पंपांचे वाटप होणार, अर्ज प्रक्रियेला सुरूवात
By नितीन चौधरी | Published: May 17, 2023 04:25 PM2023-05-17T16:25:56+5:302023-05-17T16:26:03+5:30
आतापर्यंत राज्यात ५६ हजार सौरपंप बसविण्यात आले असून पंप बसविण्यात पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
पुणे : महावितरणकडून वीजपुरवठा होऊ न शकणाऱ्या भागांत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या (मेडा) प्रधानमंत्री कुसूम योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंपांचे वाटप करण्यात येते. या योजनेसाठी एक लाख पंपांच्या उद्दीष्टापैकी अजुनही सुमारे २५ हजार पंपांचे वाटप झालेले नाही. त्यासाठी बुधवारपासून (दि. १७) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी ठरविण्यात आलेल्या उद्दीष्टातून व आलेल्या अर्जांतून या सौरपंपांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मेडाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी दिली. आतापर्यंत राज्यात ५६ हजार सौरपंप बसविण्यात आले असून पंप बसविण्यात पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. तर सिंधुदूर्ग तळात आहे.
पीएम कुसुम योजनेतून शेतकऱ्यांसाठी ९० ते ९५ टक्के अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण गटासाठी ९० टक्के तर अनुसुचित जाती व जमातींच्या गटासाठी ९५ टक्के अनुदान देण्यात येते. यात केंद्राचा ३० टक्के तर राज्याचा ६० ते ६५ टक्के वाटा अशतो. केंद्र सरकारच्या नवीन व नुतनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने २०२१ मध्ये राज्यासाठी १ लाख सौरपंपांचे उद्दीष्ट दिले होते. त्यानुसार या पंपांचे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरातून १ लाख १८हजार ८९८ जणांनी यासाठी अर्ज केले होते. त्यातील ९९ हजार ३३१ अर्जांची छाननी करण्यात आली. पात्र अर्जदारांपैकी ७० हजार ५२९ जणांनी स्वहिस्सा भरला आहे. तर ६९ हजार ६६९ अर्जदारांनी सौरपंप पुरवठादाराची निवड केली आहे. त्यानंतर ५६ हजार शेतकऱ्यांच्या शेतावर पंप बसविण्यात आले आहेत. हे पंप वाटप करताना जिल्हानिहाय उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. आणखी सुमारे २० हजार पंप बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आणखी २५ हजार पंपांसाठी बुधवारपासून (दि. १७) ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले.
''पुढील एक लाख पंपांसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच त्यासाठीही अर्ज मागविण्यात येतील. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून मागणी कमी आहे. तर औरंगाबाद विभागासाठी उद्दीष्टापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. जिल्ह्यांच्या उद्दीष्टानुसार या पंपांचे वाटप होईल. जेथून अर्ज कमी येतील अशा शिल्लक पंपांचे वाटप इतर जिल्ह्यांमध्ये करण्यात येईल. - रवींद्र जगताप, महासंचालक, मेडा''
सर्वाधिक पंप : पुणे : ४१८६
सर्वात कमी : सिंधुदुर्ग : ९३
सर्वाधिक उद्दीष्ट : नगर : ५७२१
सर्वात कमी उद्दीष्ट : गडचिरोली : १३२४