पावसापासून संरक्षणासाठी न्यायालयाच्या आवारातच वकिलांची व्यवस्था करा: उच्च न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 11:42 AM2020-06-19T11:42:37+5:302020-06-19T11:43:52+5:30
राज्यातील न्यायालयांचे कामकाज गेल्या काही दिवसांपासून 2 शिफ्टमध्ये सुरू झाले आहे..
पुणे : राज्यातील न्यायालयातील कामकाज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असताना न्यायालयातील बार रूम, कॅन्टीन आणि वकिलांचे चेंबर बंद ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. एकीकडे हे सगळे बंद असताना गर्दी होऊ नये यासाठी वकिलांना न्यायालयाच्या पॅसेजमध्ये थांबण्यास देखील मनाई करण्यात आली होती. त्यामुळे पाउस सुरू झाल्यावर आम्ही थांबायचे कुठे? असा प्रश्न वकिलांना पडला होता. मात्र यावर उपाय म्हणून उच्च न्यायालयाने वकिलांना थांबण्यासाठी न्यायालयाच्या पॅसेजमध्ये व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाला दिला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात वकिलांना दिलासा मिळाला आहे.
लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज २३ मार्च पासून बंद होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील न्यायालय दोन शिफ्ट मध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र न्यायालयाचे कामकाज सुरू करत असताना कोरोनाचा सवंसर्ग रोखण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी उच्च न्यायालयाने काही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ८ जुनपासून राज्यातील सर्व न्यायालयातील कामकाज सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अशा दोन शिफ्ट मध्ये कामकाज सुरू झाले होते. राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये सुरू करण्या बाबत आदेश दिले आहेत.
...................
न्यायालयाचे कामकाज पुन्हा एकदा एकाच शिफ्टमध्ये सुरू करण्यात आल्यामुळे न्यायालयात होणारी वकिलांची गर्दी कमी होणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात या वकिलांच्या थाबण्याची, बसण्याची सोया न्यायालयाच्या पॅसेजमध्ये करण्याचा आदेश दिला आहे. आवारात मोठे पॅसेज, बाकडी उपलब्ध असल्याने वकिलांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था करता येऊ शकते. त्यामुळे फिजिकल डिस्टनसिंग ठेवता येईल.
ऍड . सतीश मुळीक (अध्यक्ष, बार असोसिएशन)