शैक्षणिक धोरणातील बदलासह रोजगार उपलब्ध करून द्यावा !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 01:17 AM2019-04-06T01:17:01+5:302019-04-06T01:17:52+5:30
तरूणांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे कट्ट्यावरून रिपोर्टिंग
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे
सामाजिक समस्यांबरोबरच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे आतापर्यंतच्या कुठल्याच सरकारने गांभीर्याने पाहिलेले नाही. प्रत्येक वेळी नवीन आश्वासने दिली जातात. तरुणांसाठी हे करणार, ते करणार; मात्र तसे काहीच होताना प्रत्यक्ष दिसत नाही. पदवीधरांनाही नोकरी नाही. नोकरभरतीच्या १०० जागा असतील, तर त्यासाठी ५० हजार अर्ज येतात. ही चिंतनीय बाब आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. त्याबाबत कोणताही उमेदवार बोलत नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये केवळ आश्वासने दिली जातात.
- सलीम हनीफ शेख, विद्यार्थी
एकाच घरातील खासदार, आमदार कशासाठी?
प्रत्येक राजकीय पक्षात घराणेशाही आहे. एकाच घरामध्ये आमदार, नगरसेवक, पक्षातील प्रमुख पदे दिली असल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. म्हणजेच कार्यकर्त्यांनी आयुष्यभर केवळ यांच्याच मागे फिरायचे का? निवडणुक ीमध्ये काम करण्यासाठी कार्यकर्ते पाहिजे असतात. मात्र निवडणुकीला उमेदवार म्हणून ते त्यांच्या मुला-मुलींना संधी देतात. त्यांच्या पक्षाच्या कुठल्या बैठकीला अथवा आंदोलन, उपोषणाला कधीच ते उपस्थित नसतात किंवा सहभागी होत नाहीत. काहींना तर पक्षाची विचारधाराही माहिती नसते.
- जगदीश कुमावत, विद्यार्थी
शैक्षणिक धोरणात गुणवत्तेस प्राधान्य हवे
राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी चालेल. मात्र त्या सरकारने शैक्षणिक धोरणात बदल करून गुणवत्तेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कारण ८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. परंतु राखीव कोट्यातील विद्यार्थ्याला कमी गुण असले, तरी प्रवेश मिळतो. सरकारने शैक्षणिक आरक्षण दिले पाहिजे. मात्र गुणवत्तेमध्ये तडजोड करू नये. त्यामुळे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
- श्रद्धा अविनाश बारवकर, विद्यार्थिनी
सामान्यांनाही बँकांकडून कर्ज सहज उपलब्ध व्हावे
देशातील भ्रष्टाचार कमी होणे आवश्यक आहे. तरच आपला विकास होऊ शकतो. बॅँकांना बुडवून परदेशात पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही बड्या उद्योजकांना कर्ज सहज कर्ज दिले जाते. सर्वसामान्यांना बॅँकेकडून कर्ज घ्यायचे असेल, तर सहज मिळत नाही. सरकारने रोजगारनिर्मिती करणे आवश्यक आहे. रोजगार नसल्याने अनेक तरुण नैराश्यात आहेत. अनेक गावांमध्ये आजही वीज पोहोचलेली नाही. केवळ काही मोठ्या शहरांमध्ये सुविधा आहे. ग्रामीण भागात सुविधांचा अभाव आहे.
- समीर अकबर शेख, विद्यार्थी
समस्या सोडविण्यासाठी ठोस कृती हवी
देशातील प्रत्येक निवडणुकीमध्ये विकासाबद्दल बोलण्यात येते. मात्र खरोखरच विकास झाला आहे, असे म्हणता येईल का? शहरात अनेक ठिकाणी स्वच्छतागृह नाहीत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत. बेरोजगारी वाढतच आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, देशातील महिला असुरक्षित, लहान मुलींवरील वाढलेले अत्याचाराचे प्रमाण अशा प्रमुख समस्या देशभरात आहेत. त्यांना आळा घालण्यात आला पाहिजे. त्यासाठी ठोस कृती व्हावी. निवडणुका आल्या की या मुद्द्यांची आठवण होते, त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते.
- अक्षय दुनघव, विद्यार्थी