रेमडेसिविरबाबत ठोस निर्णय घ्या अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:11+5:302021-04-17T04:11:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: रेमडेसिविर इंजेक्शनबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पक्षाचे शहराध्यक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: रेमडेसिविर इंजेक्शनबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्याआधीच प्रशासनाने नियोजन करायला हवे होते. आता त्याचा काळाबाजार सुरू झाल्यावर प्रशासन जागे झाले. आता रूग्णांच्या नातेवाईकांना रूग्णालयांतील डॉक्टर व औषध विक्रेत्यांनी रेमडिसिविर इंजेक्शन आणण्यास सक्ती करू नये आणि रूग्णालयांनीच रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रबंध केला पाहिजे. कोविड रूग्णालयामधील औषध विक्रेत्यांनी आपल्या रूग्णालयांना लागणाऱ्या एकूण रेमडेसिविर इंजेक्शन होलसेलरकडे मागणी करावी, त्यांच्या मागण्यांनुसार त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन पुरविले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांना होलसेलरकडून रेमडेसिविर इंजेक्शन विकले जात नाही, असे असतानासुध्दा गेले ५ ते ६ दिवस पुण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रूग्णालय आणि रूग्णालयातील औषध विक्रेते रूग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन आणण्यास सक्ती करतात त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत, असे बागवे म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे आपत्ती काळातील विशेष अधिकार वापरून इंजेक्शनचा पुरवठा, वितरण सुरळीत करावे, अन्यथा काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा बागवे यांंनी दिला.