पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:14 AM2021-09-04T04:14:43+5:302021-09-04T04:14:43+5:30
पुणे : कोरोनामुक्त गाव या उपक्रमाप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महापालिकेनेही कोरोनामुक्त वार्ड करावेत, अशा ...
पुणे : कोरोनामुक्त गाव या उपक्रमाप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महापालिकेनेही कोरोनामुक्त वार्ड करावेत, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत़
डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत गुरुवारी कोरोना आढावा बैठक झाली. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, गटनेते पृथ्वीराज सुतार, आयुक्त विक्रम कुमार, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, ज्ञानेश्वर मोळक आदी या वेळी उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे यांनी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, कोरोनामुळे निधन झालेल्या पालिकेतील ८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर प्रलंबित नियुक्त्या तत्काळ द्याव्यात. महिला बालविकास विभागाने कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने ४०७ विधवा महिलांचे पुर्नवसन करावे व या कार्यवाहीचा अहवाल १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले.
चौकट १
महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासन स्तरावरून मान्यता देण्यासाठी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.