बारामती शहरात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घ्या
By admin | Published: May 23, 2017 05:24 AM2017-05-23T05:24:56+5:302017-05-23T05:24:56+5:30
सासवड, जेजुरी नगरपालिकांप्रमाणे बारामती नगरपालिकेनेदेखील शहारामध्ये संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घ्यावा. सासवड आणि जेजुरी नगरपालिकेने शहरातील सुव्यवस्था आणि शांतता
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : सासवड, जेजुरी नगरपालिकांप्रमाणे बारामती नगरपालिकेनेदेखील शहारामध्ये संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घ्यावा. सासवड आणि जेजुरी नगरपालिकेने शहरातील सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला. सर्वच स्तरातून या दोन्ही नगरपालिकांचे कौतुक होत आहे. त्यामुळे बारामती नगरपालिकेनेदेखील असा निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फैयाज शेख यांनी केली.
यासंदर्भात त्यांनी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यामध्ये संपूर्ण शहरातील दारूबंदीबरोबरच बारामती शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे. त्यामुळे घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल. शहरामध्ये मुस्लिम, माळी, ख्रिश्चन समाजासाठी समाजमंदिरांची उभारणी करावी, तसेच महिला, मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे आहेत, असे शेख यांनी सांगितले. नगरपालिकेची झालेली हद्दवाढ लक्षात घेता सध्या असणारे नगरपालिका कर्मचारी अपुरे पडत आहेत. त्यामुळे हद्दवाढ ठिकाणी अनेक कामे खोळंबून राहतात. नागरिकांना एका कमासाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात. हद्दवाढ झाल्यानंतर नगरपालिकेचे उत्पादनदेखील वाढले आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यांवर वाढलेला कामाचा ताण लक्षात घेता नवीन कामगारभरती करणे गरजेचे आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच आमराई परिसरातील १०० टक्के पाणीपट्टीवाढीचा ठराव रद्द करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या परिसरात राहणारे नागरिक हे कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्यांच्याकडून पाणीपट्टी आकारली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.