हॉस्पिटलवर ‘हेलिपॅड’ बंधनकारक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:35 AM2018-07-16T01:35:29+5:302018-07-16T01:35:32+5:30
गेल्या काही वर्षांत पुणे शहराच्या लोकसंख्येत आणि क्षेत्रफळामध्ये मोठी वाढ झाली आहे.
पुणे : गेल्या काही वर्षांत पुणे शहराच्या लोकसंख्येत आणि क्षेत्रफळामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे पुणे आता मुंबईपेक्षादेखील मोठे शहर झाले असून, वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शहरातील हॉस्पिटल्सला ४ एफएसआय लागू होणार असून, इमारती ३६ मजल्याहून अधिक उंच होणार आहेत. त्यामुळे ग्रीन कॅरिडॉरसाठी अशा सर्व इमारतींवर यापुढे ‘हेलिपॅड’ बंधनकारक करा, असा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारण समितीच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
नगरसेवक आबा बागुल यांनी याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारण समितीसमोर ठेवला आहे. सध्याची वाहतुकीची गंभीर स्थिती लक्षात घेता अवयव प्रत्यारोपणासाठी ‘ग्रीनकॉरिडॉर’ करणे भविष्यात जवळजवळ अशक्यच होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवीन हॉस्पिटल्च्या बांधकामांना परवानगी देताना इमारतीवर बंधनकारक करण्याची नितांत गरज आहे. रुग्णांना अत्यावश्यक सेवा वेळेत मिळण्यासाठी आता ठोस पावले उचलावी लागणार आहेत. यासाठी एअरअॅब्युलन्सची सुविधा उभारण्यास चालना द्यावी लागणार आहे. त्यानुसार महापालिकेने डीसी रुल्समध्ये बदल करणे आवश्यक आहे.
>ग्रीनकॉरिडॉरसाठी पर्याय
सध्या एअरअॅब्युलन्सची सुविधा उपलब्ध आहे, परंतु हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड मर्यादित आहे. या सर्व बाबींचा विचार करता ग्रीनकॉरिडॉर करणे अनिवार्य आहे. पण वाढत्या वाहतुकीचा विचार करता ते अशक्य ठरणार आहे. त्यामुळे नवीन हॉस्पिटल्सना बांधकाम परवानगी देताना इमारतीवर हेलिपॅड बंधनकारक करावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.