उसाच्या शेतात बिबट्या ठाण मांडून
By admin | Published: February 4, 2016 01:37 AM2016-02-04T01:37:57+5:302016-02-04T01:37:57+5:30
येथे गटवाडी शिवारात ऊसतोडणी सुरू असताना अचानक बिबट्या बछड्यांसह उसातून बाहेर येऊन गुरगुरला. त्यामुळे भेदरलेल्या मजुरांनी पळ
आळेफाटा : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे गटवाडी शिवारात ऊसतोडणी सुरू असताना अचानक बिबट्या बछड्यांसह उसातून बाहेर येऊन गुरगुरला. त्यामुळे भेदरलेल्या मजुरांनी पळ काढला व ऊसतोड बंद केली. दरम्यान हा बिबट्या बछड्यांसह तेथेच उसाच्या शेतात ठाण मांडून बसला आहे. वन विभागाने तेथेच दुपारच्या सुमारास पिंजरा लावला आहे; पण अद्यापपर्यंत बिबट्या उसाच्या शेतातून बाहेर आलेला नाही.
याबाबतची माहिती अशी : गटवाडी शिवारात मुकुंद रामचंद्र कुटे यांची ऊसतोडणी विघ्नहर कारखान्याचे वतीने सुरू आहे. आज (दि. ३) सकाळी नेहमीप्रमाणे ऊसतोड मजुरांनी ऊसतोडणी सुरू केली. आठच्या सुमारास बिबट्या बछड्यांसह या ऊसशेतातून कडेच्या बाजूने बाहेर आला. प्रथम तो गुरगुरला व नंतर त्याने डरकाळी फोडली. समोरच बिबट्या दिसल्याने ऊसतोडणी मजुरांची एकच धांदल उडाली. बिबट्या आता हल्ला करणार, या भीतीने त्यांनी पळ काढला. त्यांनी ऊसउत्पादक मुकंद कुटे यांना माहिती देऊन ऊसतोडणी बंद केली. तर, बिबट्या बछड्यांसह ऊसतोड सुरू असलेल्या ठिकाणापासून जवळच उसाचे शेतात ठाण मांडून बसला.
दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. वनकर्मचारी व ग्रामस्थ तेथे गेले त्यांनी फटाके वाजवले. मात्र, तरीही बिबट्या जागीच गुरगुरत होता. जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या परिसरात वन विभागाचे रेस्क्यू पथक पाठविले. तेही तेथे गेले असता त्यांनाही बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. अखेर वन विभागाने या ठिकाणी दुपारनंतर पिंजरा लावला.
पिंजरे लावले आहेत; मात्र बिबटे जेरबंद होत नसल्याने दहशत पसरली आहे. (वार्ताहर)