स्थायीचे कामकाज पारदर्शी करणार
By admin | Published: March 30, 2017 03:00 AM2017-03-30T03:00:48+5:302017-03-30T03:00:48+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामकाज पारदर्शी होण्यावर भर आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे कामकाजही
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामकाज पारदर्शी होण्यावर भर आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे कामकाजही पारदर्शीच असेल. सर्व कामांचा व त्यासाठी लागणाऱ्या पैशांचा हिशेब जनतेला देण्यास आम्ही बांधील आहोत, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ यांनी पक्षाने निवडणुकीसाठी तयार केलेल्या जाहीरनाम्यातील सर्व गोष्टींना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘‘सर्वांना बरोबर घेऊनच सर्व कामे केली जातील. प्रत्येक पैशाचा हिशेब देऊ. वाहतूक, कचरा, पाणी हे शहरातील सध्याचे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यांना प्राधान्य दिले जाईल.’’
पत्रकारांनाही समितीचे कामकाज पाहता येईल, असे मोहोळ म्हणाले. त्यात लपविण्यासारखे काहीही नाही. याआधी असे का करीत नव्हते त्याबद्दल बोलायचे नाही; मात्र समितीची बैठक सुरू असताना पत्रकारही उपस्थित राहू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृह नेते भिमाले पत्रकारांना समितीच्या बैठकीची दर मंगळवारी माहिती दिली जाईल, असे सांगत असताना मोहोळ यांनी त्यांना उपस्थितही राहता येईल, अशी दुरुस्ती केली.
(प्रतिनिधी)
अंदाज पत्रक आज
आयुक्त बुधवारी (दि. ३०) स्थायी समितीला सन २०१७-१८चे प्रशासनाचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. त्याविषयी काय वाटते, असे विचारले असता मोहोळ यांनी ‘त्यांना आधी सादर करू द्या; नंतर बोलू,’ असे सांगितले. समितीत त्यावर चर्चा होईल. पुणेकरांना अपेक्षित असलेलेच काम समितीकडून होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन आम्ही त्यांना विकासाच्या कामात आमचे सहकार्य राहील, असा संदेश दिला असल्याचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.