महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेल पन्नास रुपये लिटर करा; पुण्यातून संभाजी ब्रिगेडची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 06:25 PM2021-11-05T18:25:41+5:302021-11-05T18:25:55+5:30
पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपये दर कमी करणे म्हणजे लोकांची जखम कुरतडणे आणि जखमेवर'ची खपली काढण्याचा प्रकार आहे
पुणे : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडेल इतकी इंदर दरवाढ झाली. महाराष्ट्रासह भारतीय जनतेला लुटण्याचे काम मोदी सरकार करत आहे. गगणाला भिडणारी ही इंधन दरवाढ मोदी सरकारचे पाप आहे. पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपये दर कमी करणे. म्हणजे लोकांची जखम कुरतडणे आणि जखमेवर'ची खपली काढण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेल पन्नास रुपये लिटर करावे अशी मागणी पुण्यातून संभाजी ब्रिगेडने केली आहे.
ऐंशी रुपये पेट्रोल - डिझेल दरवाढ झाल्यावर बोलणाऱ्या स्मृती इराणी, हेमा मालिनी, राजनाथ सिंह सध्या कुठेच दिसत नाहीत. कारण यांना सत्तेची मस्ती आणि पदाची सुस्ती चढलेली आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमला हा देश लुटायचा आहे. सर्व शासकीय कंपन्या अदानी अंबानीला विकून या देशात बलाढ्य यंत्रणांच खाजगीकरण करायचं आहे. देशभक्तीचे गाजर दाखवून व 'अच्छे दिना'च्या काळ्या रांगोळ्या काढून हा देश रसातळाला गेला. हे संघी वास्तव आहे. थोडी तरी अर्थतज्ञांकडून अक्कल विकत घेऊन तात्काळ इंधन दरवाढ ५० टक्केच्या वर कमी केली पाहिजे. म्हणून पेट्रोल डिझेलचे दर ५० रुपये लिटर पर्यंत दर कमी केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.
महागाईने सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले
देशात जीएसटी (GST) ची नवीन कर प्रणाली नरेंद्र मोदी सरकारने आणली. त्याला इंधन अपवाद ठेवले. पेट्रोल, डिझेल, गॅस हे सर्व जीएसटीच्या कक्षा आणाव्यात अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. सर्वसामान्य माणसाची दिवाळी 'कडू' करणाऱ्या केंद्र सरकारला तसेच गप्प बसणाऱ्या राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना सुद्धा शुभेच्छा देणार नाही. कारण महागाई ने सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे.