कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाबाबत सकारात्मक निर्णय घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:31 AM2018-06-15T02:31:45+5:302018-06-15T02:31:45+5:30
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत कुलगुरूंना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
नारायणगाव - कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत कुलगुरूंना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
महाराष्ट्र राज्यात सन २०१२-१३ पासून कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याबाबत कृषी विद्यापीठांनी संबंधित संस्थांना कळविले असून, कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठांनी घेतलेल्या निर्णयामुळे उद्भवलेल्या समस्येबाबत कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले व याविषयी सविस्तर चर्चा केली.
या वेळी कृषी खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी मंत्री महोदयांना याविषयी सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रवींद्र जगताप, शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर हे उपस्थित होते. या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
या वेळी कृषी महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, ग्रामोन्नती मंडळ, नारायणगावचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, प्रकाश पाटे, साहेबराव नवले, प्रभाकर चांदणे, नीलेश नलावडे, अरविंद पोटे, ज्ञानदेव वाफारे, संजय भांड, गोवर्धन चव्हाण, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, सोमनाथ काटकर उपस्थित होते.
यापूर्वीही पांडुरंग फुंडकर कृषिमंत्री असताना या विषयावर बैठक बोलावली होती; परंतु चारही विद्यापीठांचे कुलगुरू या बैठकीसाठी हजर राहिले नाहीत, त्यामुळे या विषयावर तोडगा निघू शकला नव्हता. याप्रसंगी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कृषी तंत्रनिकेतन हा सन २०१२ पासून सरू असणारा अभ्यासक्रम कृषी विद्यापीठांनी सुरू ठेवावा, यासाठी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर विचार विनीमय करण्यासाठी दि. १८ जून रोजी एकत्रित बैठक बोलावली जाईल.
अभ्यासक्रम व्यावसायिक दर्जा, कृषी पदवीसाठी प्रवेश, अभ्यासक्रम सुधारणा, याप्रश्नांबाबत सुद्धा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल , असा विश्वास या वेळी व्यक्त केला. या प्रश्नांबद्दल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची जोरदार मागणी केली होती.
विद्यापीठाच्या पातळीवरून कृषि तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम बंद केल्यामुळे राज्यभरातील शिक्षण घेणारे १६ हजार विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत सापडले आहेत. या विषयावर उपाय म्हणून पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रम बदल करून व्यावसायिक करण्याबाबत समितीने सुधारित अभ्यासक्रम शिफारस केला आहे. त्याच आधारे कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम व्यावसायिक आणि सुधारित करावा. तोपर्यंत सध्या सुरू असलेला अभ्यासक्रम ठेवावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.