महापालिकेने रुग्णालय, संस्थांना दिलेल्या जागेची माहिती सार्वजनिक करा; माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:44 IST2025-04-15T09:44:25+5:302025-04-15T09:44:44+5:30
पुणे महापालिकेने कुठल्या कुठल्या संस्थांना कुठल्या कुठल्या कारणाने आणि काय अटी शर्तीच्या नियमाने जागा दिल्या आहेत

महापालिकेने रुग्णालय, संस्थांना दिलेल्या जागेची माहिती सार्वजनिक करा; माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी
पुणे : महापालिकेच्या अनेक जागा सह्याद्री रुग्णालय व इतर संस्थांना देण्यात आल्या आहेत. या सर्व जागा देताना करण्यात आलेल्या अटी, शर्ती व करार महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून ते सार्वजनिक करावेत, अशी मागणी माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सह्याद्री रुग्णालयाची जागा पुणे महापालिकेची आहे. पालिकेने काही वर्षाच्या कराराने कोकण विकास महामंडळाला ही जागा दिली होती. कोकण विकास महामंडळाने सदरची जागा सह्याद्री ट्रस्टला दिली. सह्याद्री ट्रस्टने सदरची जागा कॅनडाच्या कुठल्यातरी कंपनीला हस्तांतरित केली आहे, अशी माहिती मिळत आहे.
त्यानमुळे याबाबतची सर्व कागदपत्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकावीत, तसेच पुणे महापालिकेने कुठल्या कुठल्या संस्थांना कुठल्या कुठल्या कारणाने आणि काय अटी शर्तीच्या नियमाने जागा दिल्या आहेत, याचा देखील तपशील काढावा आणि तो जाहीर करावा. एरंडवणा येथील महापालिकेची जागा अभिनव शाळेला दिली आहे. सिम्बॉयसिस संस्थेला देखील पालिकेची जागा दिली आहे. त्यांच्या अटी शर्ती काय आहेत, ते देखील जाहीर करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.