राजकीय वरदहस्त लाभलेल्या ‘अशांत कोथरूड’ ला भयमुक्त बनवा; धंगेकरांची पोलिस आयुक्तांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 10:23 AM2024-01-09T10:23:42+5:302024-01-09T10:30:47+5:30
मुले गुन्हेगारीकडे करिअर म्हणून, तर काही मुले राजकारणाचा प्लॅटफॉर्म म्हणून वळत आहेत
पुणे : कोथरूड परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार करून होणारे खून आणि हादरवून सोडणारे गंभीर गुन्हे वाढत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे ‘अशांत कोथरूड’ अशी कोथरूडची ओळख बनली आहे. त्यामुळे राजकीय वरदहस्त लाभलेल्या सर्व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयात केली.
कोथरुड भाग हा गुन्हेगारीचा अड्डा बनत असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच, पुण्याचे पोलिस आयुक्त यांची भेट घेत त्यांच्याकडेही वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करणारे निवेदन सोमवारी (ता. ८) दिले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
धंगेकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत या भागात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे कोथरूड अशांत बनले आहे. गुंडांच्या टोळ्या या भागात कार्यरत आहेत. त्यांच्यातील गँगवॉर याआधी पुणेकरांनी अनुभवलेले आहे. त्यातच गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागला आहे. त्यामुळे सामान्य जनता चिंतेत आहे. आता कोणाकडे पहायचे, कोणाकडे दाद मागायची? हा प्रश्न जनता उपस्थित करत आहे.
गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागल्याने नवतरुणांमध्ये गुन्हेगारीची क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे सुशिक्षित असलेली अठरा ते वीस वयातील मुले गुन्हेगारीकडे करिअर म्हणून पाहत आहेत. तर काही मुले राजकारणाचा प्लॅटफॉर्म म्हणून गुन्हेगारीकडे वळत आहेत. हे चित्र अत्यंत घातक आहे, अशी खंत आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.
भयग्रस्त कोथरूड, अशांत कोथरूड ही कोथरूडची ओळख आपल्याला बदलायची आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने विशेष मोहीम राबवून या भागातील वाढत्या गुन्हेगारीला कायमस्वरूपी आळा बसावावा तरच गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल आणि लहान-मोठ्या मोहापायी तरुण गुन्हेगारी जगताकडे आकृष्ट होणार नाहीत. याशिवाय, कोथरूड पोलिस ठाण्यामधील रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणीदेखील आमदार धंगेकर यांनी केली.
डॉ. संजीव ठाकूर यांच्या अटकेची मागणी
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचा सखोल तपास तातडीने करावा, दोषी ठरलेले तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करावी, अशीही मागणी या भेटीवेळी पोलिस आयुक्तांकडे केली असल्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. डॉ. ठाकूर यांना अटक झाली तरच या प्रकरणात गुंतलेल्या अन्य लोकांची नावे समोर येतील. ही नावे समोर येऊ नयेत म्हणूनच काही राजकीय व्यक्ती त्यांना मदत करीत आहेत. त्यामुळे त्यांना अद्याप अटक झाली नाही, असेही ते म्हणाले.