स्मार्ट बनण्याच्या नादात मुलांना एकलकोंडेपण

By admin | Published: November 16, 2015 01:51 AM2015-11-16T01:51:46+5:302015-11-16T01:51:46+5:30

सध्याची लहान मुलं स्मार्ट आहेत. पाचव्या, सहाव्या वर्षापासून कॉम्प्युटर आणि मोबाइल सहजपणे हाताळणं, फाडफाड इंग्रजी बोलणं, टीव्हीवरच्या डान्स किंवा कॉमेडी शोमध्ये भाग घेणं,

Making smart calls to children | स्मार्ट बनण्याच्या नादात मुलांना एकलकोंडेपण

स्मार्ट बनण्याच्या नादात मुलांना एकलकोंडेपण

Next

शिवप्रसाद डांगे,  रहाटणी
सध्याची लहान मुलं स्मार्ट आहेत. पाचव्या, सहाव्या वर्षापासून कॉम्प्युटर आणि मोबाइल सहजपणे हाताळणं, फाडफाड इंग्रजी बोलणं, टीव्हीवरच्या डान्स किंवा कॉमेडी शोमध्ये भाग घेणं, अशीच स्मार्ट असण्याची परिभाषा आहे. ही मुले तासन्तास घरात टीव्ही व संगणकाच्या समोर बसून राहत आहेत. खरे तर शहरात सुरक्षेच्या कारणाने पालक मैदानी खेळ खेळण्यासाठी मुले बाहेरच पडू देत नाहीत. त्यामुळे स्मार्ट बनण्याच्या नादात मुलं एकलकोंडी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
स्मार्ट म्हणजे बुद्धिमान किंवा शहाणा नव्हे. हल्लीच्या परिभाषेत स्मार्ट असणं म्हणजे ‘चमको’ असणं. चारचौघांत इतरांपेक्षा उठून दिसणं. समाजात सहजपणे मिसळता येणं, कुणाशीही सहज बोलता येणं वगैरे. हल्लीच्या १0-१२ वर्षांच्या मुलांना हे सगळं करता येतं. इतकंच काय, याच वयात ती मोठ्यांप्रमाणे कपडे आणि केसांच्या फॅशन्स करण्यातही तरबेज बनतात. उदार पालक आणि समाजामुळे ते अमाप स्वातंत्र्य उपभोगत आहेत. त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि शिक्षण कमालीचे सोपं केले आहे. ते सहज उपलब्धही होते.
उच्च शिक्षणाची संधीही सहजपणे मिळते. मात्र, एवढे सगळं मिळून या पिढीला दैनंदिन जीवनातले साधे-सोपे हिशेब, बेरीज आणि वजाबाकी तोंडी करता येत नाही. त्यासाठी कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागते. अर्थात डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि मॉलच्या कॅश काउंटरवरील तरुण कर्मचाऱ्यांचेही काम कॅल्क्युलेटरविना चालत नाही. या पिढीच्या ह्यस्मार्टनेसह्णमधलं हे मोठंच उणं आहे. त्याचा सगळा आत्मविश्वास टेक्नॉलॉजी आणि तिचा पालकांनी चालवलेले बेसुमार लाड यांच्या खांबावर उभा आहे. त्याला स्वत: मिळविलेल्या ज्ञानाचा आणि कर्तबगारीचा पाया नाही. अनेक मुलांचे पालक आयटी, कॉपोर्रेट किंवा मल्टिनॅशनल कंपन्यांतून भरपूर पैसा मिळवतात. मुलांना उच्च राहणीमान, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, भरपूर पॉकेटमनी आणि मनमुराद स्वातंत्र्य याचा लहानपणापासून लाभ मिळतो. पालक, कोचिंग क्लासेस, इंटरनेट यांच्यामुळे सारे काही हाताशी असतं. सारं काही सहज मिळत असल्यामुळे त्यांच्यात स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची कुवत नसते. संघर्ष, अनुभव आणि परिश्रम यांच्याविना मिळालेल्या सुख-सोयींमुळे या पिढीला योग्य वयातही स्वत:चे निर्णय स्वत:ला घेता येत नाहीत. अति जपल्यामुळेही अशी मुले व्यवहारज्ञानातही कच्ची राहतात.
अलीकडे देशात वाढलेला दहशतवाद, खंडणीकरिता लहान मुलांचे अपहरण, लैंगिक शोषण व अत्याचार या विकृतीमुळे आजच्या लहान मुलांच्या आयुष्यावर भीतीचं सावट आहे. चार-पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि नंतर हत्या असेही भीषण प्रकार चालू आहेत. रेसिडेन्शियल स्कूलच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांनाही लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. मिळणाऱ्या सुबत्ता व स्वातंत्र्याला ग्रहण लागले आहे.
दहा वर्षांच्या मुलामुलींनाही संध्याकाळी जाऊन खेळणं किंवा सोसायटीच्या आसपास मोकळी जागा असल्यास तिथे एकत्र जमणं, गप्पा मारणं यांसारख्या साध्या गोष्टीचा आनंद मिळणं दुरापास्त झाला आहे. संगणक, व्हिडीओ गेम्स, टीव्हीच्या आहारी गेलेल्या आणि सामाजिक जीवन हरवून बसलेल्या या पिढीला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान, सामाजिक जीवन यांना आजची पिढी पोरकी होत आहे. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे.
काही वर्षांपूर्वी घरातलं धान्य गिरणीतून दळून आणणं, किरकोळ किराणा, भाजी खरेदी ही कामं मुलंच करत असत. नातलगांना निरोप पोहचवण्याचं कामही १४-१५ वर्षांच्या मुलांवर सोपवलं जात असे. अशा कामातून मुलांना जीवनशिक्षण मिळत असे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच हे व्यवहारी ज्ञानही मुलांना संस्कारक्षम वयात मिळायला हवं. चैन, हौसमौज, ऐश-आराम हे सारे काही दिले आहे. पण, निसर्गाच्या सान्निध्यातील खेळापासून नवी पिढी वंचित आहे. त्यामुळे व्यक्तिगत विकासात त्यांना अडचण येते. असुरक्षिततेच्या छायेत ते वावरतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात स्थानबद्ध होत असल्याने मुलं स्मार्ट होताहेत; पण स्वावलंबी नाही.

Web Title: Making smart calls to children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.