शास्त्रीय गतिरोधक बनविण्याचे काम संथ गतीने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 07:51 PM2019-09-05T19:51:15+5:302019-09-05T20:09:15+5:30
शहरातील रस्त्यांवर एकाच पद्धतीचे आणि एकाच आकाराचे गतिरोधक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता
पुणे : अनेकदा रस्त्यांवर अशास्त्रीय आणि बेकायदा गतिरोधक उभारले जातात. या गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघातच अधिक घडतात. त्यामुळे इंडीयन रोड काँग्रेस (आयआरसी) च्या निकषांनुसारच शहरातील रस्त्यांवर एकाच पद्धतीचे आणि एकाच आकाराचे गतिरोधक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली होती. परंतू, या नियमावलीच्या अंमलबजावणीचे काम संथगतीने सुरु असल्याचे चित्र आहे.
शहरात दीड ते दोन हजार गतिरोधक आहेत. शहरामध्ये वाहतूक विषयक सुधारणा करण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलीस, आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या बैठकीमध्ये गतिरोधकांविषयीची नियमावली मांडण्यात आली होती. सद्य:स्थितीमध्ये रस्त्यांवर असलेले गतिरोधक अशास्त्रीय स्वरुपाचे आहेत. हे गतिरोधक तयार करताना उंची, रुंदीचे निकष पाळले जात नाहीत. या गतिरोधकांमुळे अनेकदा अपघातांचीच शक्यता अधिक असते. यापुर्वीच्या नियमावलीमध्ये आयआरसीने केलेल्या बदलांचा नव्या नियमावलीमध्ये पालिकेने समावेश केला आहे.
पालिकेच्या पथ विभागाने हे काम हाती घतले. तसेच याबाबत क्षेत्रिय कार्यालयांनाही एकाच प्रकारचे गतिरोधक तयार करण्याच्या आणि अस्तित्वात असलेल्या गतिरोधकांनाही नियमावलीनुसार दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार क्षेत्रिय कार्यालय स्तरावरही कामाला सुरुवात करण्यात आली. परंतू, गेल्या पाच महिन्यात ज्या गतीने हे काम व्हायला हवे होते त्या प्रमाणात झालेले नाही.
=====
रस्त्याची जेवढी रुंदी असेल तेवढ्या रुंदीवर रम्ब्लर स्ट्रीपच्या सुरुवातीला कॅट्स आय (पिवळ्या रंगाचे) लावणे आवश्यक आहे. रस्त्यावरील वाहने गतिरोधकावरून पदपथांवर जाऊ नये यासाठी पदपथांच्या कडेने आणि स्पीडब्रेकरच्या बाजूला प्लास्टिकचे बोलार्डस लावण्यात यावेत. गतिरोधकाच्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पाण्याचा निचरा होणे आवश्यक असल्याचे आणि त्यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना करण्यात आलेल्या होत्या.
====
रस्त्यावर गतिरोधक येण्यापुर्वी वाहनचालकांना सुचना मिळावी याकरिता फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. गतिरोधक येण्यापुर्वी ४० मीटर अंतरावर ६० सेंटीमीटर आकाराचे हे फलक असणे आवश्यक आहे. तसेच गतीरोधकाच्या आधी पाच मीटरवर थर्मोप्लॅस्ट रंगाने रब्मलर स्ट्रीप करणे आवश्यक आहे. तसेच गतीरोधक आयआरसीने दिलेल्या नियमानुसारच रंगवणे आवश्यक आहे. प्रत्येक गतिरोधकाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना असणे आवश्यक आहे. परंतू, अभावानेच या नियमांचे पालन झाल्याचे दिसते.