मलेरिया देशातून हद्दपार करणार : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 06:39 PM2019-09-09T18:39:36+5:302019-09-09T18:57:18+5:30
देशामध्ये सध्या मंदीचे वातावरण असले तरी औषध निर्माण क्षेत्र चांगली प्रगती करीत आहे.
पुणे : पोलिओला देशातून ज्या प्रमाणे हद्दपार केले त्याप्रमाणे मलेरियाला देखील २०२५ पर्यंत हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, देशात डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रोगावर प्राधान्याने काम करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे दिली.
सिरम इन्स्टिट्यूटच्या हडपसर येथील नव्या औषध प्रकल्पाचे उद्घाटन डॉ. वर्धन यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला, नताशा पूनावाला व डॉ. वर्धन यांच्या पत्नी नूतन गोयल उपस्थित होत्या. डॉ. वर्धन यांनी टेल ऑफ टू ड्रॉप्स या स्वलिखित पुस्तकाची प्रत सायरस आणि अदर पूनावाला या पितापुत्रांना दिली.
डॉ. वर्धन म्हणाले, दिल्लीचा आरोग्यमंत्री असताना १९९३ साली एका वैद्यकीय परिषदेत काही डॉक्टरांनी भारत पोलिओग्रस्तांमधे जगात आघाडीवर असल्याचे सांगितले. तसेच, देशात दिल्ली व दिल्लीमधे माझ्या विधानसभा मतदारसंघात अधिक रुग्ण असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याबाबतची माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेकडून मागविली. तेव्हा ३१ ऑगस्ट १९९३ रोजी पोलिओ निर्मूलनाच्या मोहीमेचा विचार पक्का केला. जागतिक आरोग्य संघटनेने देशाला पोलिओमुक्त घोषित केले. ज्या मोहीमेची सुरुवात माझ्या काळात झाली, त्याचे यश केंद्रीय आरोग्यमंत्री असताना पाहायला मिळाले.
मलेरिया आणि डेंगीसारखे रोग आरोग्य विभागाच्या रडारवर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर २०३० पर्यंत मलेरिया हद्दपार करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. देशातून २०२५ पर्यंत मलेरिया हद्दपार करण्यात येईल. त्याच बरोबर डेंगी, कुष्टरोग देखील कार्यक्रम पत्रिकेत अग्रभागी आहेत. सर्वच रोग हे काही हद्दपार होणार नाहीत. मात्र, रोग नियंत्रणात ठेवण्याचे काम केले जाईल, असे डॉ. वर्धन यांनी स्पष्ट केले.
---
औषध क्षेत्रात मंदी नाही : अदर पूनावाला
देशामधे सध्या मंदीचे वातावरण असले तरी औषध निर्माण क्षेत्र चांगली प्रगती करीत आहे. सध्या सिरम इन्स्टिट्यूट दरवर्षाला दीड अब्ज औषधांचे विविध डोस तयार करीत आहे. नवीन औषध प्रकल्पामधे ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, अगामी पाच वर्षांत येथे साडेतीन हजार रोजगार निर्माण होतील. तसेच, डोस निर्मितीची क्षमता ५० कोटींनी वाढेल असे अदर पूनावाला यांनी सांगितले.
--
सिरमचे डेंगीवरील औषध लवकरच : सायरस पूनावाला
सिरम इन्स्टिट्यूट तर्फे डेंगीवर औषध तयार करण्यात येत असून, त्याच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे औषध बाजारात येईल, अशी घोषणाच सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख सायरस पूनावाला यांनी मंगळवारी केली.