आफ्रिकेतील 'मालावी हापूस' पुण्यातील मार्केटयार्डात दाखल; एका आंब्याची किंमत तब्बल ३०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 05:23 PM2021-11-18T17:23:30+5:302021-11-18T17:29:48+5:30
पुण्यातील मार्केट यार्ड तसेच मुंबईतील बाजार समितीच्या आवारात आफ्रिकेतील मालावी देशातून हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे
पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड तसेच मुंबईतील बाजार समितीच्या आवारात आफ्रिकेतील मालावी देशातून हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात मालावी हापूसच्या एका पेटीचा दर फळाचे आकारमान आणि प्रतवारीनुसार नऊ ते चौदा फळांसाठी चार ते सव्वाचार हजार रुपये असा दर आहे. पुण्यातील बाजारपेठेतून हैद्राबाद, बंगळुरू, रायपूर, नागपूर, सांगली, कोल्हापुरात माल पाठविण्यात येत आहे, अशी माहिती व्यापारी संदीप खैरे यांनी सांगितले.
कोकणाप्रमाणेच मालावीतील वातावरण हापूस आंब्याच्या लागवडीला पोषक आहे. आफ्रिकेतील मालावी देशात एका युरोपियन कंपनीकडून हापूस आंब्यांची लागवड केली जाते. अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर आंबे, केळी, अननसाची लागवड करण्यात येत आहे. युरोपियन कंपनीने मालावीत आंबा लागवड केल्यानंतर सुरुवातीला हापूसची आवक तुरळक प्रमाणात होत होती. २०१६ मध्ये मालावी हापूसची पहिल्यांदा पुणे, मुंबईतील घाऊक फळबाजारात आवक झाली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मालावी हापूसची आवक वाढल्याचे संदीप खैरे यांनी यावेळी सांगितले.
मार्केट यार्डातील फळबाजार तसेच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पहिल्या टप्प्यात एकूण ७०० ते ८०० खोक्यांमधून मालावी हापूसची आवक झाली आहे. पुणे, मुंबई, अहमदाबाद, राजकोट, कोल्हापूर, सांगलीतील बाजारपेठेत मालावी हापूस विक्रीला पाठविला जातो. मागील पाच वर्षे मालावी हापूसची आयात केली जात असून गेल्या आठवड्यात मालावी हापूसची आवक सुरू झाली. एका पेटीत साधारणपणे तीन किलो आंबे बसतात. फळांच्या आकारमानानुसार एका पेटीत नऊ ते चौदा आंबे बसतात. मालावी हापूसची आयात भारतात दरवर्षी केली जाते.