NDA मध्ये प्रशिक्षणावेळी मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू, जोश रनदरम्यान घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 11:47 PM2021-09-25T23:47:10+5:302021-09-25T23:50:58+5:30
NDA : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी जोश रन चे आयोजन करण्यात आले होते. १२ किमी धावण्याची ही स्पर्धा होती. यात मोहम्मद सहभागी झाला होता.
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) शनिवारी प्रशिक्षणादरम्यान एका कॅडेटचा मृत्यू झाला. हा कॅडेट मालदीव येथील असून एनडीएत सुरु असलेल्या ‘जोश रन’ दरम्यान ही घटना घडली. कॅडेट मोहम्मद सुलतान अहमद (वय २१) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी जोश रन चे आयोजन करण्यात आले होते. १२ किमी धावण्याची ही स्पर्धा होती. यात मोहम्मद सहभागी झाला होता. धावतांना त्यांला चक्कर आल्यासारखे वाटले आणि तो कोसळला. त्याला तातडीने एनडीएच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहिती झोन ३ च्या पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी माहिती दिली. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजू शकणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
मोहम्मद हा १२ मार्चला एनडीएच्या १४५ व्या तुकडीत दाखल झाला होता. या प्रकरणी एनडीए प्रशासनातर्फे चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच मालदीव वकिलातीला याची माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही एनडीऐ प्रशासनाने दिली. दरम्यान, याप्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात कलम १७४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.