पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आले आढळून; उरुळी कांचनमधील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 02:26 PM2021-10-18T14:26:21+5:302021-10-18T14:26:30+5:30
अर्भक टाकणाऱ्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या क्रूर आणि निर्दयी घटनांचा पोलिसांनी छडा लावण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन नजीकच्या शिंदवणे घाट परिसरात दोन दिवस वयाचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडलेची घटना ताजी असतानाच, रविवार १७ ऑक्टोबरला सायंकाळी ६ - ३० वाजण्याच्या सुमारास डाळिंब रोड परिसरात पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अर्भक टाकणाऱ्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या क्रूर आणि निर्दयी घटनांचा पोलिसांनी छडा लावण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील कर्मचारी बाळू घाडगी यांना फोनद्वारे उरुळी कांचन परिसरातील डाळींबकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पुरूष जातीचे अर्भक टाकून दिले असल्याची माहिती दिली. त्याठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सदाशिव गायकवाड, पोलीस हवालदार मेश्राम आदी तात्काळ पोहोचले.
त्यावेळी या पथकाला जनाभाऊ कांचन यांच्या मालकीच्या चाळीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर लाईटच्या डी.पी. जवळ एक बेशुध्द अवस्थेत सदर अर्भक निपचित पडलेले दिसून आले. अर्भकाला पाहून वय समजले नाही. परंतु त्याचे सर्व अवयव तयार झाल्याचे दिसून आले. त्यास रुग्णवाहिकेतून पुणे येथील ससुन रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तपासणीनंतर वैदयकीय अधिका-यांनी बाळाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पोलिसांनी सदर ठिकाणी जमलेल्या लोकांकडे व आजूबाजूच्या परीसरामध्ये चौकशी केली असता काहीही माहिती मिळाली नाही. सदर अर्भक हे मयत झालेले असताना त्याची गुप्तपणे विल्हेवाट लावून त्या अर्भकाचा जन्म झाल्याचे उद्देशपुर्वक लपवून ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस हवालदार वसंत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.