गुंड संतोष जगतापच्या श्रध्दांजलीचा फ्लेक्स माळेगाव पोलिसांनी हटवला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 01:03 PM2021-10-25T13:03:28+5:302021-10-25T13:07:40+5:30
उरळी कांचन येथे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत विविध गुन्हे दाखल असलेल्या संतोष जगतापवर गावठी पिस्तूल व हत्यारांनी बंदिस्त असणाऱ्या मारेकऱ्यांनी पूर्व वैमनश्यातून गोळ्या झाडून खून केला होता
बारामती (सांगवी ) : हवेली तालुक्यातील उरळी कांचन येथे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत विविध गुन्हे दाखल असलेल्या संतोष जगतापवर गावठी पिस्तूल व हत्यारांनी बंदिस्त असणाऱ्या मारेकऱ्यांनी पूर्व वैमनश्यातून गोळ्या झाडून खून केला होता. त्याला भावपूर्ण श्रध्दांजली देणारा अनधिकृत फ्लेक्स बारामती तालुक्यातील सांगवी येथे झळकल्याने खळबळ उडाली. मात्र, माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना माहिती कळताच सांगवी येथे धाव घेत गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण रोखण्याच्या हेतूने बॅनरबाजी हटविण्याच्या सूचना देऊन फ्लेक्स काढून टाकण्यात आला. यामुळे फ्लेक्स लावणाऱ्या तरुणांनी पोलिसांच्या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे.
संतोष जगताप हा २०११ साली वाळू व्यवसायातून झालेल्या राहू हत्याकांड मधील मुख्य आरोपी होता. अशा बॅनरबाजीमुळे तरुण मुलांच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल होत असते. याचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना मिळाल्याने बॅनरबाजीचा फ्लेक्स तात्काळ उतरविण्यात आला. यावेळी गावचे सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील यांना बोलावून घेऊन यापुढे अनधिकृत बॅनरबाजी हटवून परवानगी शिवाय बॅनर न लावण्याच्या सूचना दिल्या.
सांगवी येथील चांदणी चौकात ही अनधिकृत बॅनरबाजी करण्यात आली होती. गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण होण्यास खऱ्या अर्थाने शत्रूला द्वेषभावना निर्माण होण्यासाठी बॅनरबाजी कारणीभूत ठरत असते. माळेगाव सारख्या ठिकाणी बॅनरबाजीमधून भांडणाच्या घटना समोर आल्या होत्या. आशातच सांगवीत भावपूर्ण श्रध्दांजलीचा बॅनर झळकल्याने खळबळ उडाली. तालुका पोलिसांनी गुंडगिरी संपुष्टात आणली असतानाच पुन्हा छोटेमोठे गुंड डोके वर काढू लागले आहेत काय ? अशा चर्चांना उधाण आता आले आहे. मात्र, पोलिसांनी धडकपणे श्रध्दांजली देणारे अनधिकृत बॅनर हटविल्याने पुन्हा अशा घटना होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने खबरदारी घेणे गरजेचे आहे.