माळेगावात गुरू शिष्याच्या जोडीचा ‘राष्ट्रवादी’ला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 02:05 PM2022-10-22T14:05:27+5:302022-10-22T14:07:37+5:30
विरोधकांनी एकमेकांना पेढे भरवीत आनंदोत्सव साजरा केला...
माळेगाव (बारामती) : सोमेश्वर कारखान्याची दहा गावे माळेगावला जोडण्याचा ठराव आवाजवी मतानी मंजूर करणाऱ्या माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाचा ठराव साखर आयुक्तालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे विरोधकांनी एकमेकांना पेढे भरवीत आनंदोत्सव साजरा केला.
माळेगाव कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सोमेश्वर कारखान्याची दहा गावे समाविष्ट करण्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात प्रचंड घोषणाबाजी व खंडाजंगी उडाली. यावेळी हा ठराव आवाजवी मतांनी मंजूर करून सत्ताधारी सभेतून निघून गेले.
मात्र, या निर्णयाविरोधात विरोधकांनी प्रती सभा घेऊन या ठरावाला विरोध दर्शविला. तसेच जवळपास ९० टक्के सभासदांचा विरोध असल्याचे दिसून आले. या सभेचे निरीक्षण करण्यासाठी प्रादेशिक उपसंचालक संजय गोंदे व विशेष लेखापरीक्षक द्वारकानाथ पवार आले होते. या निरीक्षकांनी हा ठराव सभागृहापुढे मांडलाच नाही. त्यामुळे ठराव मंजूर होण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच बहुसंख्य सभासदांनी या ठरावास प्रथमपासून विरोध केलेला होता, छोट्या गटाने मंजूर मंजूर असा गोंधळ करीत ते निघून गेले, असा अहवाल साखर आयुक्तलयाला दिला होता. तोच अहवाल साखर आयुक्तालयाने स्वीकारला. या निर्णयामुळे माळेगाव कारखान्याला १० गावे समाविष्ट करण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे.
मात्र, सत्ताधारी संचालक मंडळाने हा ठराव मंजूर असल्याने तो साखर आयुक्त यांच्याकडे पाठविला. या ठरावाविरोधात विरोधकांनीदेखील सभेचे चित्रीकरण, ठराव मंजूर नसल्याचे सभासदांचे म्हणणे पाठविले. या सभेचे निरीक्षक यांनी पाठविलेला अहवाल व सभासदांचा असलेला विरोध लक्षात घेऊन दहा गावे समाविष्ट करण्याचा ठराव मंजूर न करण्यात आल्याचे दिसून येते, असे प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी आदेश दिला आहे.
दरम्यान, या निर्णयाचे स्वागत विरोधी संचालक रंजन तावरे यांनी केले आहे. यावेळी माजी संचालक राजेश देवकाते, शशिकांत कोकरे, शशिकांत तावरे, अशोक सस्ते, प्रकाश सोरटे, ॲड. शाम कोकरे, युवराज तावरे, माजी सरपंच जयदीप विलास तावरे, माजी उपसरपंच अजित तांबोळी, प्रमोद तावरे, रोहन कोकरे, रोहित जगताप, अशोक खामगळ, विकास जगताप, भालचंद्र देवकाते, रंजित खामगळ, नामदेव खामगळ, केशवराव देवकाते व अशोक जाधव उपस्थित होते.