माळीण दुर्घटना : गाव नवे, तरी जखमा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 05:03 AM2018-07-30T05:03:05+5:302018-07-30T05:03:14+5:30
एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या साऱ्या जखमांतून सावरत आता पुन्हा माळीण उभे राहिले आहे.
घोडेगाव : एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या साऱ्या जखमांतून सावरत आता पुन्हा माळीण उभे राहिले आहे. त्याला उद्या ३० जुलैला ४ वर्षे पूर्ण होत आहेत. नव्या ठिकाणी पुनर्वसन झालेले असले, तरीही काळजावर कोरलेले व्रण आणि मनातल्या वेदना अजूनही पूर्णत: मिटलेल्या नाहीत, हे माळीणवासीयांना भेटल्यावर जाणवत राहते.
३० जुलै २०१४ ची सकाळ. रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा मोठा लोंढा गावाच्या दिशेने वेगाने आला. डोंगरावरची झाडे भिंगरीसारखी उडत खाली आली. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदात संपूर्ण गावच ढिगाºयाखाली गाडले गेले. या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले. दुर्घटनेतून वाचलेले माळीण ग्रामस्थ सध्या नवीन बांधण्यात आलेल्या गावठाणात राहत आहेत.
माळीण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ ग्रामस्थ ढिगाºयाखाली सापडून मयत झाले. यातील ९ लोक जखमी अवस्थेत सापडले, तर ३८ लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले. शासकीय यंत्रणेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढिगाºयाचे खोदकाम केले व १५१ मृतदेह बाहेर काढले. या आठ दिवसांत विविध नेत्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. अनेक सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, कंपन्या माळीणला मदत करण्यासाठी पुढे आल्या.
शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे ८.५० लक्ष रुपये देण्यात आले आहेत.
जुनं गाव ते गावंच होतं : विजय लेंभे
दि.३० जुलै २०१४ चा कधीही न विसरणारा दिवस. अजूनही ते क्षण मनातून जात नाहीत. गेलेल्या माणसांची खूप खूप आठवण येते. ती परत येणार नाहीत. झालेलं नुकसान भरून निघणार नाही. टीव्हीवर एखादी घटना पाहिली की माझं माळीण गाव आठवतं. आज आम्ही नवीन घरात राहतो, ही घरे खूप चांगली आहेत; पण खरं सांगतो आमची जुनी घरं कच्ची होती, मातीची-दगडांची होती; पण संदेश देणारी होती. शेवटी जुनं गाव ते गावंच होतं.
चिकूची इमानदारी
गावची उद्ध्वस्त झालेली जागा पाहून सैरभैर झालेला चिकू आजही माळीणच्या लोकांबरोबर नवीन माळीणमध्ये फिरताना दिसतो. मातीच्या ढिगाºयावरून फिरताना त्याच्या नाकाला झालेल्या जखमेचा व्रण आजही नाकावर ठळक दिसतो. माळीण दुर्घटनेत आठही दिवस या श्वानाने जागा सोडली नाही. आजही हा चिकू मालक हरी झांजरे यांच्याबरोबर नवीन माळीणमध्ये फिरत असतो. आपली इमानदारी त्याने अजूनही सोडलेली नाही. माळीण दुर्घटनेला चार वर्षे पूर्ण होत असताना चिकूकडे पाहून अनेक आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहात नाहीत.
भीती वाटली, तरी धडाडी ठेवून राहतो : विठाबाई लेंभे
पावसात थोडी भीती वाटते; पण धडाडी ठेवून राहावे लागते. गाव शेती, जनावरं सोडून तर जाता येत नाही आणि सगळी लोकं जवळ असल्यामुळे काही वाटत नाही. यावर्षी पाऊस खूप झाला; मात्र मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे गावाला काही झालं नाही. गेल्यावर्षी खचल्यानंतर, झालेल्या कामांमुळे यावर्षी कुठं जास्त खचलं पण नाही. प्रत्येक घरं थोडी थोडी पाझरत आहेत. गेल्यावर्षी जास्तच पाझरत होती, मात्र छतावर काम केल्याने पाझर कमी झाला, अशी भावना विठाबाई लेंभे यांनी व्यक्तकेली.
काही मागण्या अजूनही अपूर्ण
डोंगर कोसळून गाडल्या गेलेल्या माळीण दुर्घटनेला चार वर्षे पूर्ण होत असताना, अजूनही माळीण ग्रामस्थांच्या काही मागण्या अपूर्ण राहिल्या आहेत. माळीणमधील १३ कुटुंबांना घरे मिळाली नाहीत; त्यामुळे यातील दोन कुटुंबे अजूनही पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहेत. या उर्वरित कुटुंबांना घरे मिळावित.
तसेच, नवीन पुनर्वसित गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असून, पाण्यासाठी घेण्यात आलेले बोअर, विहिरींचे स्रोत वाया गेले. उन्हाळ्यात या नवीन गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता, तर ग्रामस्थांनी काही दिवस माळीण फाट्यावरून पाणी वाहिले. नवीन झालेल्या पायरडोहमधून पाणीपुरवठा केला जावा. येथून पाणी मिळाल्यास कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर होईल.
तसेच, नवीन गावठाणातील घरांचे स्लॅब गळत आहेत. अंतर्गत रस्त्यांची कामे अपूर्ण राहिली आहेत, ही कामे केली जावीत; तसेच माळीणमध्ये आर्थिक उत्पन्नासाठी ठोस साधन नाहीत म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या मागण्या अपूर्ण राहिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.