माळीणकर पुन्हा आठवणींनी ‘खचले’
By admin | Published: June 27, 2017 07:46 AM2017-06-27T07:46:49+5:302017-06-27T07:46:49+5:30
माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील व्यक्तींच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पांत पहिल्याच पावसात अनेक त्रुटी समोर आल्या.
नीलेश काण्णव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील व्यक्तींच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पांत पहिल्याच पावसात अनेक त्रुटी समोर आल्या. पावसाचे पाणी बांधलेल्या गटारात न मावल्याने पाण्याचा लोंढा शाळेच्याजवळ आला व मातीच्या भरावावर बांधलेले रस्ते खचले, गटारे तुटली, पाइपलाइन उखडल्या, लाईटचे पोल वाकले, भिंतींना तडे गेले. पुन्हा एकदा माळीणची ती धडकी भरवणारी आठवण जागी झाली.
पहिल्याच पावसात अशी दुरवस्था झाली तर पुढे मुसळधार पावसात काय होईल, या चिंतेने ग्रामस्थ भयभीत झाले असून पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जाण्याची मागणी करू लागले आहेत. काही ग्रामस्थांनी तर पत्र्याच्या घरात जाण्याची बांधाबांध देखील सुरु केली आहे.
माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत माळीणवासीयांचे दु:ख काही कमी होताना दिसत नाही. माळीणकरांना पक्की घरे देऊ, असे आश्वासन शासनाने दिले. त्याप्रमाणे घरेही दिली, पण पहिल्याच पावसात या गावातही जुन्या गावासारखी जमीन खचू लागली.
गाव उभारण्याचे काम करताना केलेले मोठमोठे मातीचे भराव खचले. त्यामुळे अंतर्गत रस्ते खचले, अंतर्गत गटारे तुटली, पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन फुटल्या, ड्रेनेजलाईन उघडली, लाईटचे पोल पडल्याने अंतर्गत वीजपुरवठा खंडित झाला, चेंबर फुटले यामुळे नवीन माळीणची पुरती दयनीय अवस्था झाली.