माळीणकरांना मिळाला तात्पुरता निवारा
By admin | Published: October 6, 2014 06:44 AM2014-10-06T06:44:48+5:302014-10-06T06:44:48+5:30
माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना आज तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या शेडचे वाटप आज करण्यात आले
घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना आज तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या शेडचे वाटप आज करण्यात आले. प्रथम प्राथमिकता असलेल्यांना ही घरे दिली असून कमी पडलेली घरे लवकरच दिली जाणार आहेत. मात्र ज्यांना घरे मिळाली नाहीत त्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.
माळीण गावावर डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना राहण्यासाठी माळीण फाट्यावर पत्र्याची तात्पुरती निवारा शेड बांधण्यात आली आहेत. एकूण ३२ शेडची आवश्यकता असताना येथे कमी जागा उपलब्ध झाल्याने २५ शेड उभी करण्यात आली. आसाणे आश्रमशाळेत राहणारे तसेच माळीण परिसरात नातेवाइकांच्या आश्रयास असलेले अथवा खोली भाड्याने घेऊन राहणाऱ्या लोकांना प्रथम प्राथमिकतेने घरे देण्यात आली, तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना मागे ठेवण्यात आले. मात्र, या वेळी ज्यांना शेड मिळाली नाहीत, त्यांनी नाराजी व्यक्त करीत दिवाळीपर्यंत घरे मिळाली नाहीत तर आम्ही वेगळा पवित्रा घेऊ, असा इशारा दिला.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘ज्यांना प्रथम गरज आहे, त्यांना ही घरे दिली आहेत. शेड बांधण्याचे काम बंद केलेले नाही. उर्वरित कुटुंबांना लवकरच शेड देण्यात येतील. कोणीही संभ्रम निर्माण करून घेऊ नये. तसेच हा तात्पुरता निवारा आहे. ७२ पक्की घरे बांधायची असून त्यासाठी आवश्यक असलेल्या ८ एकर जागेचा प्रश्न सुटलेला नाही. ही जागा मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी. हा प्रश्न सुटल्याबरोबर कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आराखडा तयार केला जाईल. यामध्ये रस्ते, लाईट, पाण्यापासून १८ प्रकारच्या नागरी सोई-सुविधा देण्याची दक्षता आम्ही घेणार आहोत. निवडणुकीनंतर या कामाला गती देणार आहोत.’
या वेळी प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, विवेक महाराव, गटविकास अधिकारी विवेक इलमे, उपअभियंता एस. बी. देवढे, सहायक प्रकल्प अधिकारी सी. डी. मोरे, सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे उपस्थित होते. गोविंद झांजरे, सोनाबाई अंकुश, हरिश्चंद्र झांजरे अशा ७ कुटुंबांना घरे मिळाली नाहीत. (वार्ताहर)