माळीणची पुनरावृत्ती भाेरमध्ये थाेडक्यात टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 08:22 PM2019-08-08T20:22:56+5:302019-08-08T20:24:30+5:30
भाेर येथे माळीण सारखी घटना थाेडक्यात टळली आहे. कोंढरी गावातील डोंगराला भेगा पडुन संपुर्ण कडा, दगड, गोटे झाडे, बांबु मातीसह वाहुन येथील घरांजवळ आले.
भोर : तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोंढरी गावातील डोंगराला भेगा पडुन संपुर्ण कडा, दगड, गोटे झाडे, बांबु मातीसह वाहुन येथील घरांजवळ आले. ही घटना बुधवारी रात्री घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत भात पिके, बांबु, झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडुन ५ घरातील नागरीकांना बाहेर काढुन स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र, गावातील इतर घरांनाही धोका असल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण असून संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भोर शहरापासुन २५ किलोमीटर अंतरावर तर भोर-महाड रस्त्यापासुन २ किलोमीटवर असलेल्या ४० घरांचे ३५६ लोकवस्तीचे कोंढरी हे गाव आहे. गावाच्या वरच्या बाजुला भोकरीचा माळ येथील डोंगरावतील जमिनीला मोठमोठया भेगा पडुन बुधवारी डोंगरातील दगडमाती, झाडे, मेसबांबुची बेटे पावसाच्या पाण्याने वाहुन येऊन मोठी दरड कोसळली. यात कोणतीही जीवीतहाणी झालेली नाही. मात्र ५० फुट अंतरावर दरड थांबल्याने डोंगरा खालील पाच घरे बचावली. अन्यथा ही घरे ढिगा-या खाली गाडली गेली असती.
डोंगरातील दरडीजवळ असलेली भिवा बापु पारठे, चंद्रकांत गोविंद मांढरे, सुरेश चंद्रकांत पारठे, किसन धोंडीबा खरुसे, सुनिल रावजी पारठे, दगडु भागु पारठे यांना संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने स्थलांतरीत केले आहे. या घटनेत संदीप रघुनाथ पारठे यांची मेसाची १०० बेटे व ५० आंब्याची झाडे तर भागु दगडु पारठे यांची १०० मेसाची बेटे असे एकुण २ हजार बांबुच्या झाडांचे नुकसान झाले. तर भिवा पारठे यांचे ५० आंब्यांची झाडे दरड पडुन वाहुन गेले आहे. सुरेश चंद्रकांत पारठे प्रदीप रमेश पारठे यांची भाताची लागवड केलेली २ एकर भात शेती दगड मातीने गाडुन गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करित आहेत.
दरड कोसळण्याचा धोका कायम
गावातील सरु बाई यशवंत पारठे व यशवंत पारठे यांच्या जमिनीत कृषी विभागाच्या वतीने सलग समतर चरांच काम करण्यात आले आहे. या जमिनीला दोन ते तीन फुटांच्या भेगा पडल्या आहेत. या शिवाय कोंढाळकरवस्ती येथील जमिनीलाही भेगा पडल्या असुन पावसाचे पाणी जाऊन भेगा वाढत असल्याने या ठिकाणीही दरड कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे संपुर्ण गावाला धोका असल्याने गावात भितीचे वातावरण आहे.
प्रशासनातर्फे उपाययोजना सुरू
घटनेची महिती मिळताच भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी या ठिकाणी पाहणी करुन पाच कुटुंबांना हिर्डोशी येथील माध्यमीक विद्यालयात हलवले आहे. तलाठी, सर्कल, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी कालपासुन गावातच आहेत.तर गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, उपअभियंता आर.एल ठाणगे यांनीही भेट देऊन पाहणी केली. सहयाद्री रेसक्युसची टीम, महावितरण गावात दाखल झाली असुन काम सुरु आहे. यावेळी जि.प.सदस्य रणजीत शिवतरे, सुनिल भेलके, लक्ष्मण दिघे, विलास मादगुडे, बबन मालुसरे बाळासो मालुसरे उपस्थित होते.
संपूर्ण गावाचे पुनर्वसन करा
या घटनेतून थोडक्यात गाव वाचल्याने भितीचे वातावरण आहे. यामुळे पूर्ण गावाचे स्थलांतर करण्याची मागणी कोंढरी ग्रामस्थांनी केले. येथील ५२ कुटुंबांना सुरवडी (ता फलटण) येथे पुर्नवसन मिळाले आहे.मात्र अद्याप त्यांना जमिनीचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे संपुर्ण गावाचेच पुर्नवसन सुरवडी येथे करावे अशी मागणी ग्रामस्थ करित आहेत.