देलवडी खूनप्रकरणातील १० आरोपींवर मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:50 AM2018-10-28T00:50:51+5:302018-10-28T00:51:09+5:30
वाळूच्या व्यवसायातून झालेल्या खूनप्रकरणी दहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात येणार आहे.
यवत : देलवडी (ता. दौंड) येथे वाळूच्या व्यवसायातून झालेल्या खूनप्रकरणी दहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात येणार आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळूमाफियांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई होण्याची आताची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या टोळीवर अशीच कारवाई करण्यात आली होती.
देलवडी येथे ५ आॅगस्ट २०१८ रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल ऊर्फ पिंटू शेलार (वय ३१) याचा लोखंडी कोयता व डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. आरोपी सोमनाथ विष्णू शेलार याने त्याचे साथीदार संतोष जगताप, समीर जगताप, अनिल मोहिते, दीपक दंडवते, विशाल मेमाणे, रणजित वांझरे यांनी मिळून खून केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना बबलू ढेंगळे व अनिल ऊर्फ सुनील अरुण शितोळे यांचादेखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले होते. मृत पिंटू ऊर्फ स्वप्निल शेलार याला ठार मारण्याचा कट पुण्यातील भारती विद्यापीठासमोर एका चायनीज हॉटेलमध्ये वरील आरोपींनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. पिंटू शेलार याला मारण्याचा जो कट केला त्या कटाबाबत भक्कम पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले होते.
पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व सहायक पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिसांनी तपास केला. यातील पाच आरोपींना अटक केल्यानंतर इतर माहिती घेत नेमका तपास करून दौंड तालुक्यातील वाळूमाफियांची गुन्हेगारी समोर आणली. देलवडीमधील खुनात वाळूव्यवसायातील वादातून निष्ठूरपणे ठार मारणारे आरोपी पुणे ग्रामीण व पुणे शहर पोलिसांचे रेकॉर्डवरील आरोपी असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी संतोष जगताप व समीर जगताप मागील बारा वर्षांपासून वाळूव्यवसाय करीत असून, त्यांनी सन २०११मध्ये राहू येथे वाळूव्यवसायाच्या वादावरूनच दुहेरी खून व खुनाचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर दाखल गुन्ह्यात ते सध्या जामिनावर आहेत. आरोपी अनिल मोहिते व दीपक दंडवते हे देखील वाळूव्यावसायिक असून त्यांच्यावरही पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांकडे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे देलवडी खून प्रकरणातील आरोपी संपूर्ण जिल्ह्यात व इतर जिल्ह्यांमध्येदेखील दहशत करून वाळूव्यवसायात सक्रिय असल्याने त्यांच्याविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवतचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी प्रयत्न केले.
त्यांनी आरोपींवर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांची कागदपत्रे व भक्कम पुरावा गोळा करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) नुसार कारवाई करण्याची परवानगी मिळणेबाबत अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनीही करण्यास परवानगी दिल्याने आता संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार आहे.
वाळूमाफियांचा ‘दौंड पॅटर्न’
गुंडागिरीचा ‘मुळाशी पॅटर्न’ हा नव्याने येणाऱ्या चित्रपट महाराष्ट्रात चर्चेत असला तरी वाळूमाफियागिरीमधील ‘दौंड पॅटर्न’ देखील तितकाच प्रभावी आहे. दौंड तालुक्यात कुख्यात गुंड अप्पा लोंढे याने वाळूव्यवसायात निर्माण केलेली दहशत यापूर्वी सर्वांनी पाहिली होती. लोंढे याचा खून झाल्यानंतर त्यांच्याप्रमाणे वाळूव्यवसायात दहशत निर्माण करू पाहणाºया संतोष जगताप याची देखील एक वेगळी शैली आहे. देलवडी खून प्रकरणात नाव आल्यानंतर आता त्याच्यावरदेखील मोक्काअंतर्गत कारवाई होणार आहे.