म्हाळुंगे ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार
By admin | Published: May 12, 2017 05:27 AM2017-05-12T05:27:19+5:302017-05-12T05:27:19+5:30
म्हाळुंगे गावाचा पुणे महापालिकेत समावेशाचा निर्णय जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा
लोकमत न्यूज नेटवर्क
बाणेर : म्हाळुंगे गावाचा पुणे महापालिकेत समावेशाचा निर्णय जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय म्हाळुंगेकरांनी घेतला. त्यामुळे २७ मे रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी निर्णय घेत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले आहे.
३४ गावे पालिकेत समावेशाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यातच यातील काही गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. ही निवडणूक रद्द व्हावी व होणारा खर्च, वेळ व मनुष्यबळ वाचवावे या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला, असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासन महिनाभरात घेणार असून संबंधित गावांनी स्वत: निर्णय घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. दरम्यान, आज (१२ मे) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. १५ मे रोजी प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून माघारीची अंतिम तारीख १७ मे आहे.