Pune Airport| मल्टिलेव्हल पार्किंगच्या नावाखाली मॉल; समस्या वाढणार की सुटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 08:00 PM2022-11-14T20:00:43+5:302022-11-14T20:04:23+5:30
प्रायोगिक तत्त्वावर हे पार्किंग चार दिवसांपूर्वी सुरू देखील करण्यात आले आहे...
- नितीश गोवंडे
पुणे : लोहगाव विमानतळ आणि तेथील पार्किंगचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय होता. देशांतर्गत हवाई वाहतूक सेवेसह या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील वाढत आहे. यामुळे विमानतळावरील पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यासाठी म्हणून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळासमोरच मल्टीलेव्हल पार्किंग उभारणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर हे पार्किंग चार दिवसांपूर्वी सुरू देखील करण्यात आले आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून सातत्याने मल्टीलेव्हल पार्किंग असा उल्लेख केली जाणारी जागा मात्र प्रत्यक्षात एक मॉल असून इतर मॉल प्रमाणे तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खरंच पार्किंगची वाढणार की सुटणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे विमानतळ प्राधिकरणाकडून सतत मल्टीलेव्हल पार्किंग असा उच्चार केला जात असताना, प्रत्यक्षात मात्र शॉपिंग मॉल आणि २ हजार लोकांसाठी को-वर्किंग प्लेस असा कागदोपत्री उल्लेख आहे. त्यात कुठेही पार्किंग हा शब्द नसल्याने देशात पहिल्यांदाच विमानतळ प्रशासन व्यावसायिक हतूने उतरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाचे विमान वाहतुकीवर लक्ष आहे का कमाईवर असाही सवाल उपस्थित होत आहे.
२४ तास सुरू राहणाऱ्या या एरोमॉलचा एक भाग फक्त पार्किंग म्हणून वापरण्यासाठी देण्यात आला असून, यामुळे भविष्यात अनेक अडचणींमध्ये वाढ होण्याची भिती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. आधीच विमानतळासमोरील रस्ता लहान असल्याने मॉलमुळे तीथे येणाऱ्यांच्या संख्येत मोठी भर पडणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याऐवजी वाहतूक कोंडी होण्यासाठी नवीन अडचण निर्माण झाल्याचे मत पुणेकरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
१ लाख ३० हजार चौ.फुट जागा भाडेतत्वावर..
पुणे विमानतळासमोर असलेल्या हा एराेमाॅल भारतीय विमानतळ प्राधिकरणासह पेबल्स इन्फ्राटेक कंपनीकडून पीपीपी तत्वावर विकसित करण्यात येत आहे. ४ लाख ४५ हजार चौरस फुट जागे पैकी, १ लाख ३० हजार चाैरस फुट जागा ही भाडेतत्वावर देण्यात आली आहे.
नेमका एरोमॉल कसा आहे..?
१) रिटेल, रेस्टॉरंट आणि मनोरंजन हे एकाच छताखाली असलेला इतर मॉलपैकी हा एक मॉल आहे.
२) पुण्यात पहिला २४ तास सुरू राहणारा मॉल अशी जाहिरात केली जात आहे.
३) तिसऱ्या मजल्यावर ६५ हजार चौ.फुट जागेत २ हजार लोकांना काम करता येईल अशी को-वर्किंग सिस्टिम करण्यात आली आहे.
४) वीकेंडला अधिक गर्दी मॉलमध्ये होणार, इव्हेंट असणार यामुळे पार्किंगचा फायदा मॉलमध्ये येणाऱ्यांनाच होणार.
५) मॉलमधून थेट विमानतळावर जाण्यासाठी फुट ओव्हर ब्रीज बांधण्यात आला आहे.
६) मोठ्या प्रमाणात विमानतळ प्राधिकरणाला महसूल प्राप्त होणार.
समस्या नेमक्या कशा वाढणार ?
१) आधीच विमानतळासमोरील रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. मॉलमुळे त्यात भर पडणार. मॉलची पार्किंग फुल्ल झाल्यावर लोक जागा दिसेल तीथे वाहने उभी करणार.
२) मॉलमधून थेट अतीसंवेदशनशिल अशा विमानतळावर थेट प्रवेश नागरिकांनी केला तर सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो.
३) काही कारणास्तव गर्दी झाली तरी मोठा धोका उद्भवू शकतो.
४) मॉल मध्ये काम कराणारे, को-वर्कर, ग्राहकांच्याच गाड्या पार्किंगमध्ये उभ्या राहिल्या तर विमानतळावर जाणाऱ्यांनी वाहने पार्क करायची कुठे ?
५) मध्यरात्रीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका.
६) मॉलमधून फुट ओव्हर ब्रीजमुळे लोक थेट विमानतळावर जाऊ शकत असतील तर ही न परवडणारी बाब आहे.
काय करणे अपेक्षित होते-
१) पार्किंग उभारल्यानंतर जर जागा शिल्लक राहत होती तर विमानतळावरील कोअर ए`क्टिव्हिटी, एअरलाईन्स कंपन्यांना या जागेचा वापर करता आला असता.
२) यामुळे विमानतळावरील गर्दी कमी झाली असती.
३) राहण्यासाठी रुम्स गरजेच्या असतात, त्या उभारता आल्या असत्या.
४) विमान प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करता आली असती.
मला देखील याबाबत काही दिवसांपूर्वीच माहिती मिळाली. खरे पाहता या मॉलमुळे भविष्यात अनेक अडचणी विशेषतः रहदारीच्या, वाढण्याची शक्यता अधिक आहे. ‘रोगा पेक्षा औषध जालीम’ असे होऊ नये यासाठी विमानतळ प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी. मी याबाबत विमानतळ प्राधिकरण आणि खासदार गिरीश बापट यांना मेलद्वारे विविध समस्यांबाबत तातडीने कळवले आहे. या ठिकाणी विमान प्रवाशांना त्यांच्या प्रवासा संदर्भात अधिक चांगल्या सेवा सुविधा निर्माण करणे गरजेचे होते.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ