महाबँकेच्या मदतीने मळणगाव कॅशलेस
By admin | Published: December 24, 2016 12:52 AM2016-12-24T00:52:48+5:302016-12-24T00:52:48+5:30
कॅशलेस गाव ही संकल्पना सत्यात उतरवणारे राज्यातील दुसरे, तर जिल्ह्यातील पहिले गाव हा बहुमान कवठे महांकाळ तालुक्यातील
पुणे : कॅशलेस गाव ही संकल्पना सत्यात उतरवणारे राज्यातील दुसरे, तर जिल्ह्यातील पहिले गाव हा बहुमान कवठे महांकाळ तालुक्यातील मळणगावला मिळाला आहे.
बँक आॅफ महाराष्ट्र शाखा शिरढोणच्या मदतीने पैसे काढणे, आॅनलाइन पैसे पाठविणे, एका खात्यातून इतर बँक खात्यावर जमा करणे इत्यादी प्रकारचे गावातील १०० टक्के व्यवहार कॅशलेस झाले आहेत.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार रुपाली रेडेकर आणि बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी बाबासाहेब पाटील, सरपंच रमेश भोसले, बँकेचे प्रतिनिधी रवींद्र मसाले यांच्यासह १०० टक्के कॅशलेस व्यवहार करणारे गाव ही संकल्पना सत्यात उतरली आहे.
मळणगावची लोकसंख्या जवळपास चार हजार आहे. बहुतेक ग्रामस्थांचा उदरनिर्वाह दूध उद्योग व शेतीपूरक व्यवसायावर चालतो. २०१४ मध्ये उदय फडके यांनी शिरढोण शाखेचे शाखाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांत बँकेविषयी विश्वास निर्माण केला.
जाणीव जागृती कार्यक्रम, शाळांमध्ये मार्गदर्शन सत्र याद्वारे जनजागृती करून डिजीटल आर्थिक सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रमेश भोसले, सुवर्णा शिंंदे, संजय चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. (वा. प्र.)