जिल्ह्यावरचा कुपोषणाचा कलंक पुसला पाहिजे
By admin | Published: April 1, 2017 12:08 AM2017-04-01T00:08:00+5:302017-04-01T00:08:00+5:30
आपला जिल्हा विकसित असूनही कुपोषित बालके असणे ही बाब निश्चितच चांगली नाही
पुणे : आपला जिल्हा विकसित असूनही कुपोषित बालके असणे ही बाब निश्चितच चांगली नाही; किंबहुना दुर्दैवी बाब आहे. अंगणवाडीताई, मदतनीस यांनी व महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे जाऊन काम करण्याची खरी गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व लायन्स क्लब यांचे संयुक्त विद्यमाने हवेली तालुक्यातील कुपोषित बालकांना ४५ दिवसांचा खुराक (आयुर्वेदिक बिस्कीट) वाटप करण्यात आला. या वेळी देवकाते बोलत होते.
या वेळी त्यांनी जिल्ह्यात १२ हजार ५०० मध्यम वजनाची व १३०० तीव्र कमी वजनाची बालके असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, यापुढील काळात महिला व बालकल्याण विभागासाठी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यावर माझा भर राहील. तसेच कुपोषणमुक्तीबाबत आपल्या काही सूचना असतील तर त्या मला नक्की कळवा. त्या सूचनांचा विचार करून आमच्या योजनांमध्ये त्यांचा समावेश करून घेऊ. अंगणवाडीताई, मदतनीस बालकांचा आईप्रमाणे सांभाळ करत असतात. त्यांचे मानधनवाढ होणे गरजेचे आहे. यासाठी शासनस्तरावर आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही देवकाते यांनी या वेळी दिले.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे, लायन्स क्लबच्या भाग्यश्री चौंडे, आशा ओसवाल, हवेलीचे गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, हवेली तालुक्यातील पर्यवेक्षिका व अंगवाडीताई उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)