माळशेज घाट मृत्यूचा सापळा

By Admin | Published: June 29, 2015 11:55 PM2015-06-29T23:55:48+5:302015-06-29T23:55:48+5:30

नगर-कल्याण रोडवरील माळशेज घाटात दर वर्षी अपघात घडत आहेत. हा घाट अपघाताचे ठिकाण म्हणून ओळखू जाऊ लागला आहे़ सलग ३ वर्षे दरड कोसळून मोठ्या दुर्घटना

Malsege Ghat death trap | माळशेज घाट मृत्यूचा सापळा

माळशेज घाट मृत्यूचा सापळा

googlenewsNext

सचिन कांकरिया, नारायणगाव
नगर-कल्याण रोडवरील माळशेज घाटात दर वर्षी अपघात घडत आहेत. हा घाट अपघाताचे ठिकाण म्हणून ओळखू जाऊ लागला आहे़ सलग ३ वर्षे दरड कोसळून मोठ्या दुर्घटना घडल्याने या घाटातील प्रवास हा धोकादायक बनला आहे़ सुरक्षित प्रवासासाठी घाटात पर्यायी व्यवस्था किंवा रस्ता रुंद करणे ही काळाची गरज ठरली आहे. राज्य व केंद्र शासनांनी या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़
माळशेज घाट हा कल्याण-मुंबईकडे नेणारा जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो़ या घाटात दर वर्षी पहिल्या पावसात दरड कोसळण्याच्या घटना सलग दोन-तीन वर्षांपासून घडत आहेत़ असे असतानादेखील महामार्ग विभागाकडून या घटनांची कुठल्याही प्रकारे गंभीर नोंद घेतली गेलेली नाही़ २६ जुलै २०१३ रोजी या घाटात महाकाय दरड कोसळून संपूर्ण ४०७ टेम्पो चक्काचूर झाला होता़ या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला होता़ त्या वेळी तब्बल तीन-चार दिवस महाकाय दरड बाजूला करून हा रस्ता खुला करण्यात आला़ त्या वेळी दुर्घटना झाल्याचे लक्षात आले़ या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग क्ऱ.२२२ च्या वतीने रस्ता प्रमाणात रुंद करण्यात आला; परंतु धोकादायक असलेल्या दरडी दूर करण्यात म्हणावे तसे यश या विभागाला आले नाही़ नुकतेच १४ जून २०१५ रोजी मुंबईहून शिवनेरी येथे टे्रकिंगकरिता आलेल्या ट्रॅव्हल बसवर घाटातून परत मुंबईला जात असताना दरड कोसळून बसच्या मागे बसलेले वेदांत नाईक व वल्लभ क्षेत्रमाळे हे दोन २१ वर्षीय तरुण जागीच मृत्युमुखी पडले, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले़
बसमधील इतर ३ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली़ २३ जून २०१५ रोजी पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक सेवा सलग १६ तास ठप्प झाली होती. दरड कोसळून झालेल्या या घटना पाहता, माळशेज घाटातील अनेक दरडी धोकेदायक आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे़
दरड कोसळून वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही, हे दुर्दैव आहे़ मागील वर्षी दि़ २ जानेवारी २०१४ रोजी ठाणे आगारातील ठाणे-नगर-कल्याण ही एसटी बस माळशेज घाटात खोल दरीत कोसळून झालेल्या
भीषण अपघातात २७ प्रवासी
ठार झाले, तर ११ प्रवासी गंभीर
जखमी झाले होते़ ही दुर्दैवी घटना व अपघात या घाटातील हा सर्वांत मोठा अपघात आहे़

शासन पातळीवर उदासीनता
वास्तविक, माळशेज घाटातील काही भाग जुन्नर तालुक्याच्या हद्दीत, तर बहुतांश भाग हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या हद्दीत आहे़ त्यामुळे अपघात झाल्यास दोन्ही भागांतील पोलीस, महसूल आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यावर प्रचंड ताण येतो़ माळशेजचा पूर्ण घाट जुन्नर तालुक्याला जवळ असल्याने हा भाग तालुक्याला जोडल्यास होणारा त्रास कमी होईल़
परंतु, शासन पातळीवर या निर्णयाबाबत उदासीनता आहे़ शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माळशेज घाटातील घटनांमध्ये लक्ष घालून शासन पातळीवर या रस्त्यासंदर्भात ठोस निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़

आपत्कालीन यंत्रणा गरजेची
या मोठ्या अपघाताव्यतिरिक्त किरकोळ अपघातांची संख्या मोठी आहे़ माळशेज घाटात वारंवार धुके पडत असल्याने या घाटात अपघात घडण्याचे प्रकार घडतात़ घाटामध्ये कोणत्याही विभागाचे मदत केंद्र
अस्तित्वात नाही़
मुरबाड हद्दीत पोलिसांचे एक मदत केंद्र आहे; परंतु तेथे २४ तास पोलीस उपलब्ध नसतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे़ त्यामुळे या ठिकाणी आपत्कालीन मदतकार्यासाठी महामार्ग व महसूल विभाग तसेच पोलीस मदत केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहेत़
या अपघातानंतरदेखील प्रशासन जागे होईल, घाटातील धोकेदायक जागांवर ठोस पावले उचलील, अशी अपेक्षा होती; मात्र ती भंग पावली़

Web Title: Malsege Ghat death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.